Sanjay Raut : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयशाला सामोरं जावं लागलं. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर आघाडीच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारीही सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासून सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आतापासून सावध पावलं टाकत असल्याची चर्चा आहे. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. आता यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. “दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात जे घडलं तेच कदाचित उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतं”, असं सूचक भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत काय म्हणाले?

“आम्ही अनेकदा म्हटलं आहे की काँग्रेस मोठा पक्ष आहे. मात्र, दिल्लीत आम आदमी पक्ष मोठा पक्ष आहे. निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांचा एक प्रकारचा दबाव असतो. विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो. पण दिल्लीत आम आदमी पक्ष अर्थात केजरीवाल यांची ताकद जास्त आहे. सध्या दिल्लीतील वातावरण असं आहे की दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष मोठ्या मताधिक्यांनी जिंकेल. आमच्या पक्षाला दु:ख आहे की काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकमेकांवर टीका टिप्पणी करणं योग्य नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्लीत आप व काँग्रेस आमनेसामने, ठाकरे गट कुणाच्या पाठिशी? संजय राऊत म्हणाले…

“इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेस करत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या सारख्या नेत्यांच्या विरोधात ज्या प्रकारे प्रचार केला जात आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. पण निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवू शकतात. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे निवडणुका फक्त बहाणा आहेत. कारण त्या ठिकाणी अमित शाह, पंतप्रधान मोदी हे तेथील सरकारला काम करू देत नाहीत. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जर निवडणुका एकत्र लढवल्या असत्या तर आम्हाला आनंद झाल असता”, असं संजय राऊतांनी म्हटलं.

दिल्लीत ठाकरे गटाचा पांठिबा कोणाला?

दिल्लीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा पांठिबा कोणाला असं विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलं की, “आम्ही या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही महाराष्ट्रात काँग्रेसच्या बरोबर आहोत. लोकसभेतही आम्ही काँग्रेसच्या बरोबर आहोत. आम आदमी पक्षही आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी प्रचारात बॅलन्स राखला पाहिजे. याबाबत आमची उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा होईल त्यानंतर ते यासंदर्भात निर्णय घेतील. दिल्लीत काय निर्णय घ्यायचा? यासाठी आमच्या सारखे अजून काही पक्ष आहेत ते संभ्रमात आहेत. कारण दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष आहेत. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवली असती तर योग्य झालं असतं. पण आता दिल्लीची निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडली पाहिजे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

‘…तेच कदाचित मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होईल’

“इंडिया आघाडी जी बनली ती लोकसभेच्या निवडणुकीसाठी होती. त्या आघाडीला तुम्ही सर्व निवडणुकीत जोडू नका. महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी आणि केंद्रात आम्ही इंडिया आघाडीबरोबर आहोत. मात्र, एवंढ नक्की आहे की केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आमच्या संपर्कात जास्त असतात. ‘आप’च्या नेत्यांशी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगला संवाद असतो. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकले असते. पण दुर्देवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्ली सारख्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. आता जे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात घडलं तेच कदाचित उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील होऊ शकतं. कारण शेवटी ज्या लहान निवडणुका असतात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मनोबल राखण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढणं जास्त महत्वाचं असतं”, असं सूचक भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp sanjay raut the thackeray group will fight the mumbai municipal corporation election 2025 on its own gkt