महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतही चर्चा सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीत कमळ येऊ देणार नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीला लगावला होता. आता त्यांच्या या टिकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘आता आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणुकीला उभे राहतात की नाही, की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात’, असं खासदार शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाने भाव लावला’, पैसे वाटल्याचा आरोप करत संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

“महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केलं. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मतं मिळवली. लोकांची दिशाभूल एकदा करतील. मात्र, वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल”, असं श्रीकांत शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं.

“वरळीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षा होती की ४० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. फक्त ६ हजार मताधिक्य त्यांना मिळालं. त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस त्यांच्याबरोबर आहे. पण खऱ्या अर्थाने मराठी माणूस शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने आहे, हे लोकांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिलं. या ठिकाणी १९ टक्के जे मतदान शिवसेनेला पडायचं त्यापैकी १४ टक्के मतदान हे धनुष्यबाणाला झालं”, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. वरळीत चिखल असला तरी कमळ फुलणार नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता. त्यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “आता पुढच्या वेळेस वरळीमधून उभ राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पाहा”, असा खोचक टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मी जेव्हा वरळीतून निवडणूक लढवत होतो, तेव्हा सांगितलं होतं सर्वजण ही सीट पाहायला येतील. वरळी ए प्लस होत असताना सगळीकडून लोक येतात. मी सर्वांचं स्वागत करतो. काही मोठ्या लोकांनी या ठिकाणी रोड शो करावा, अशी माझी विनंती आहे. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp shrikant shinde criticizes to shiv sena mla aditya thackeray and worli vidhan sabha elections gkt