मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत विरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या यांची आरोप-प्रत्यारोपांच्या सुरु असलेल्या मालिकेवरून, भाजपा विरुद्ध शिवसेना अशी शाब्दिक लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांचे कारनामे बाहेर काढत आहेत. यामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे विरुद्ध खासदार संजय राऊत, विनायक राऊत हा सामना देखील पाहायला मिळत आहे. पत्रकार परिषदांच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. याच मालिकेत आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडूनही खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत लाव रे तो व्हिडिओ पद्धतीने प्रत्युत्तर दिले. या पत्रकार परिषदेस शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची देखील उपस्थिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणेंच्या ‘प्रहारा’वर विनायक राऊतांकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलमध्ये प्रत्युत्तर, म्हणाले…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार विनायक राऊत म्हणाले की,“काल १८ फेब्रवारी रोजी केंद्रीय सूक्ष्म मंत्री म्हणजेच सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण यांनी एक ट्वीट केलं होतं आणि खासदार विनायक राऊत यांच्यासाठी एक खास बातमी, मातोश्रीवरील चार जणांना ईडीच्या नोटीसा येणार, हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार? अशा पद्धतीने माझ्या नावाचा उल्लेख करून काल राणेंनी ट्वीट केल्याचं वाचणात आलं. आणि आज या महोदयांची एक पत्रकारपरिषद देखील सकाली ऐकण्यात आली. नारायण राणेंनी ज्या बडेजावात ट्वीटच्या माध्यमातून घोषणा केली होती आणि पत्रकारपरिषद पाहिली, तर खोदा पहाड आणि निकला कचरा..अशी त्यांची अवस्था झाली. केवळ भाजपाच्या गुडबूक मध्ये राहायचं, यासाठी नारायण राणे यांची ही चाललेली ही केविलवाणी परिस्थिती पाहिल्यनंतर, खूप वाईट वाटतं.”

Narayan Rane PC : मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित केलं, ईडीला सगळी माहिती दिली आहे – नारायण राणे

तसेच, “केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करत असताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी पत्कारायाची. हे केवळ आणि केवळ कोणाकडून शिकायचं असेल तर ते नारायण राणे यांच्याकडून. म्हणून मला एकतर सर्वजण प्रश्न करत आहेत. की एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा निश्चितच केंद्रीय पदाचा केलाला दुरुपयोग आहे. एकतर ईडीच्या नोटीसा येतील असं सांगण्याचं धाडस, करत असताना एकतर त्यांनी ईडीच्या कार्यालायतून कागदपत्रांची केलेली चोरी असेल किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल, अर्था मुंबईची ईडी गँग कशा पद्धतीने काम करते. कोणाकोणाच्या सुपाऱ्या कशा पद्धतीने वाजवल्या आहेत,हे मागील वेळी संजय राऊत यांनी आपल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं आहेच. आम्ही देखील म्हणजे मुंबईतील ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपदव्याप आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी, हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसद अधिवेशनात देखील त्या विरोधात आवाज उठवणार आहोत. पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत. ईडी सारख्या एका स्वायत्त संस्थेला बदनाम करण्याचं काम, एकतर केंद्रीयमंत्री नारायण राणे करत असतील किंवा ईडीच्या कार्यालायातील कागदपत्रांची चोरी, केंद्रीयमंत्री करत असतील असा थेट संशय कालच्या ट्वीटवरून आमच्या मनात येतोय. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष हा लावावाच लागणार. ” असंही विनायक राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp vinayak raut responds to union minister narayan ranes criticism msr