भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत वेगळेच समीकरण तयार करत मित्रपक्षाला धक्का दिला. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सुहास कांदे यांची अविरोध निवड झाली. बँकेत दोन्ही गट भाजपचे असूनही अंतर्गत वाद विवादामुळे त्यांच्या हाती काही लागू शकले नाही.
जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने १२, तर भाजप व शिवसेनेने आठ जागांवर विजय मिळवला होता. दोन पॅनलचे नेतृत्व भाजपचे पदाधिकारी करत असल्याने बँकेवर वर्चस्व मिळविणे फारसे अवघड नव्हते. तथापि, अध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे आमदार अपूर्व हिरे आणि माजी आमदार माणिक कोकाटे यांच्यात अखेपर्यंत मतैक्य झाले नाही. या दोघांसह भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. हिरे यांच्या नावाला शिवसेनेसह इतर काही संचालकांचा विरोध होता. भाजपमध्ये एकमत होत नसल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रवादी व शिवसेनेशी सहकार्य करण्याची रणनीती आखली. त्यात हिरे यांच्या गटात असणारे नाराज राष्ट्रवादीच्या संचालकांनी ऐनवेळी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे भाजपचे उमेदवार कोंडीत सापडले. अध्यक्षपदासाठी भाजपच्या तीन जणांबरोबर राष्ट्रवादीचे नरेंद्र दराडे आणि शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी अर्ज भरला होता. सभागृहात सर्व समीकरणे बदलल्याने भाजपच्या उमेदवारांसमोर अर्ज मागे घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अखेर त्यांच्यासह शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे दराडे यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले. सेनेचे सुहास कांदे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा