अलिबाग   :  राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना रायगडच्या शिवसैनिकांनीच घरचा आहेर दिला आहे. रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री असूनही ते जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कुठलेच प्रयत्न करत नाहीत आणि उद्योगमंत्री असूनही जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी देखील प्रयत्न करीत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना नेते मंगेश सातमकर यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक अलिबाग येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांनाच लक्ष्य केले. राज्यात आपली सत्ता आहे. आमचे पालकमंत्री उदय सामंत हे स्वत: उद्योगमंत्री आहेत. असे असताना जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित करत नाहीत. जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत, परंतु आमचे उद्योगमंत्री असूनही आम्हाला नोकरी किंवा सीएसआर फंड मिळत नसल्याची खंत राजा केणी यांनी व्यक्त केली. पालकमंत्री उदय सामंत कधी येतात कधी जातात समजत नाही. जिल्ह्यातील शिवसैनिकांशी त्यांचा संवाद नाही. पालकमंत्री असूनही कधी पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत, अशा शब्दात राजा केणी यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा >>> ठाकरे गटाचे सदस्य असल्याच्या कारणावरून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनीही आपल्या भाषणात केणी यांची री ओढली. उद्योगमंत्री आमच्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नाहीत. एखादी जाहीर सभा किंवा पदाधिकारी यांच्या कामाचा आढावा कधी घेतला नाही. आम्ही जिल्हाप्रमुख असताना जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न केला. आज सत्ता आहे, उद्योगमंत्री आपले पालकमंत्री आहेत, असे असताना आपल्याला न्याय मिळणार नसेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच म्हणावे लागेल, असे प्रकाश देसाई म्हणाले.

निरीक्षक मंगेश सातमकर यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसैनिकांनी गावागावात जाऊन पक्षाचे, सरकारचे काम जनतेला समजून सांगावे. गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे ती यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी केले. तर आमदार महेंद्र दळवी यांनी मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन केले. मित्रपक्षाच्या भूमिकेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आगामी काळात आपण महायुती म्हणून पुढे जाऊ असे दळवी यांनी सांगितले.

जिल्हा महिला संघटिका संजीवनी नाईक यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले. याच कार्यक्रमात शैलेश चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अलिबाग तालुकाप्रमुख अनंत गोंधळी, दीपक रानवडे, तालुका संघटक जीवन पाटील, महिला आघाडीप्रमुख शुभांगी करडे, महिला संघटक स्मिता चव्हाण, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकसभेवर पुन्हा दावा

काही दिवसांपूर्वी अलिबाग मुरुड रोहा तालुक्याच्या मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी भाजपच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी रायगडच्या लोकसभा जागेवर दावा करावा, अशी मागणी केली होती. आजच्या सभेत पुन्हा नाराजी व्यक्त करीत केणी यांनी लोकसभेच्या जागेवर ठाम दावा केला.

सातमकरांची सारवासारव

आजच्या कार्यकारिणी बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र निरीक्षक मंगेश सातमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नाराजी नाही परंतु शिवसैनिकांनी त्यांची भूमिका मांडली. नेत्याने आपल्यासाठी वेळ द्यावा, आपल्या समस्या समजून घ्याव्यात असे कार्यकर्त्यांना वाटते. उदय सामंत राज्याचा कारभार पाहतात, त्यामुळे ते पुरेसा वेळ देवू शकत नसले तरी शक्य तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करतात, असे सातमकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena officials in raigad expressed displeasure on working style of uday samant zws
Show comments