शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यातील वाक् युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. अजित पवारांची खोपडी रिकामी असून ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेनेने अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत, असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरुन अजित पवार यांनी टीका केली होती. पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार ?, असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर टीकास्त्र सोडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू असून या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही, हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली.

अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या छंदाविषयी टोला लगावला होता. यावर उद्धव ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिले होते, याची आठवणही अग्रलेखात करुन देण्यात आली.  ‘या महाशयांनी एकदा आमच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. पण आम्ही आमचे छंद उघडपणे लोकांसमोर जोपासू शकतो. आम्ही आमच्या पंढरीची वारी, शिवरायांचे गडकोट किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचे जे छंद जोपासले आहेत ते उघडपणे करू शकतो. पण अजित पवार त्यांच्या छंदाचे प्रदर्शन उघडपणे करू शकतील का?. या गटारी किड्याचे नेमके काय छंद आहेत व त्या छंदांसाठी त्याने साताऱ्यात काय रेशमी उद्योग सुरू केले त्याविषयीची सखोल माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले देऊ शकतील, असे शिवसेनेने म्हटले आहे.

अजित पवार व त्यांच्या टोळीने ७०-८० हजार कोटींचा जलसिंचन घोटाळा केला नसता तर आजच्या दुष्काळ निवारणासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असता. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली कुणी जलसंधारणाची लूट केली, कुणी बँका बुडवल्या, कुणी साखर कारखाने भंगारात काढले व महाराष्ट्रच भंगारात काढून शिवरायांच्या महाराष्ट्राची वाट लावली, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

विरोधी पक्षाचे नेते म्हणून अजित पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँगेसने गेल्या चार वर्षांत काय काहीच केले नाही. याऊलट भाजपाचा चौखुर उधळलेला ‘टांगा’ महाराष्ट्रात शिवसेनेने रोखला आणि भाजपाला बहुमत मिळू दिले नाही. पण त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल भाजपाच्या टांग्यात चढून ‘तुम्ही सरकार बनवा आम्ही पाठिंबा देतो,’ असे सांगत होते. अजित पवारांनी त्या टांग्यात चढून पटेलांना खाली खेचले असते तर त्यांच्या हिमतीस दाद दिली असती. पण आता सिंचनातील घोटाळे बाहेर येतील म्हणून  अजित पवार गप्प बसले. भाजपची चमचेगिरी करत दिवस काढले, अशी टीका शिवसेनेने केली. ७० हजार कोटींच्या घोटाळ्यात सहीसलामत सुटण्यासाठी भाजपाचे जोडे पुसण्याची करसेवा केली. त्यामुळे ते आज सुटकेचा आनंद घेत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.  हा पळपुटा माणूस अयोध्येतील राममंदिरावर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर घसरला, म्हणून आम्ही त्यांची ही खेटराने पूजा केल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

 

Story img Loader