खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त समजताच शिर्डी व राहाता येथे त्यांचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळय़ाचे दहन करून या पक्षांतराचा निषेध केला.
शिर्डीत नगरपंचायतीच्या छत्रपती व्यापारी संकुलासमोर व राहाता येथे शिवाजी चौकात वाकचौरे यांच्या पुतळय़ाचे दहन करण्यात आले. संजय शिंदे, दिनेश शिंदे, बापू ठाकरे, सुयोग सावकारे, राजू बोऱ्हाडे आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. वाकचौरे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या संपर्कात होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे.
काँग्रेसने गेल्या वेळेस शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वाकचौरे यांना उमेदवारी नाकारली होती. नंतर त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीसह निवडणुकीतही विजय मिळवला. तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली असून, याच निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे अभय शेळके यांनी या वेळी सांगितले.
ज्यांच्या मेहरबानीने वाकचौरे शिवसेनेत गेले, त्यांचीच निवडणुकीत निवडून येण्याची शाश्वती नाही. शिवसेनेच्या विरोधात आपण निवडून येणार नाही याची खात्री असतानाही वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्यामागे केवळ आíथक तडजोडी आणि साईबाबा संस्थानात स्वत:च्या नियुक्त्या करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना मतदारसंघात शिवसैनिक बंदी घालणार असून, शिवसेना स्टाइलने त्यांना सडेतोड उत्तर देण्याचा इशारा शेळके यांनी दिला आहे.

Story img Loader