शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सेनेचा त्याग न करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली असली तरी रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांचा प्रचार न करण्याचाही त्यांचा निर्धार कायम असल्यामुळे येथील शेकापचे उमेदवार रमेश कदम यांनाच त्याचा लाभ होण्याची चिन्हे आहेत.
कदम आणि गीते यांच्यातील राजकीय ‘सख्य’ जगजाहीर असून संधी मिळेल तेव्हा दोघेहीजण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. जातीचे राजकारण करत गीतेंनी आपले खच्चीकरण केल्याचा कदमांचा आरोप असून या निवडणुकीत गीतेंचा प्रचार न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे, तसेच सेनेचे केंद्रीय नेतृत्वही गीतेंनाच पािठबा देत असल्यामुळे पक्षनेतृत्वावरही कदम नाराज आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत शेकापची सेनेबरोबर युती होती, पण या वेळी ती तोडत शेकापने राष्ट्रवादीचे असंतुष्ट माजी आमदार रमेश कदम यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे, युतीतर्फे गीते आणि शेकापचे कदम यांच्यात तिरंगी सामना रंगला आहे. त्यातून गीते स्वाभाविकपणे अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत रमेशभाईंना पडद्याआडून बळ देऊन पक्षनेतृत्व आणि गीते या दोघांनाही एकाच वेळी झटका देण्याचा रामदासभाईंचा मनसुबा असल्याचे सांगितले जाते.
या निवडणुकीनंतर सुमारे चार महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी अन्य काही वाट चोखाळण्याच्या दृष्टीने चाचपणी म्हणूनही कदमांच्या या डावपेचांकडे पाहिले जात आहे.

Story img Loader