शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची पक्षांअंतर्गत वादाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे म्हटले जात होते. अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचे म्हटले जात होते. त्यावर खुलासा करत ती क्लिप आपली नसल्याचे रामदास कदम यांनी म्हटले. दरम्यान, रामदास कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“अनिल परबांना एसटी कामगारांसाठी वेळ नाही पण रामदास कदम आणि त्यांच्या मुलाला राजकारणातून संपवण्यासाठी तीन दिवस ते रत्नागिरीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तिथे सभा घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि सूर्यकांत दळवीसोबतच्या माणसांना पद देण्यात आले. मला विश्वास आहे उद्धव ठाकरेंना याची कल्पना नसेल. योगेश कदमने रश्मी ठाकरेंसोबत यासंदर्भात संवाद साधला आणि हे उद्धव ठाकरेंना सांगण्याची विनंती केली. योगेश कदमने अनिल परबांसोबतही संवाद साधला पण त्यांची भाषा अशी आहे की ते जसे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ज्यांनी शिवसेना तिथे मोठी केली त्यांनाच आता तिथे बाजूला करण्यात आले आहे,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
शिवसेनेतून बाहेर पडणार का? रामदास कदम म्हणाले, माझी मुलं…
“उदय सामंत यांनी १५ दिवसांपूर्वी तिथे येऊन तीन मेळावे घेतले आणि योगेश कदमच्या नावाचा उदोउदो केला. त्यानंतर काल ते अनिल परबांसोबत आमच्या विरोधात उभे राहिले. आम्हाला शिवसेना म्हणजे काय हे उदय सामंत शिकवत आहेत. अख्खे आयुष्य आम्ही शिवसेनेसाठी घालवले आहे. ज्या पद्धतीने आम्हाला संपवले जात आहे त्यात उद्धव ठाकरेंनी लक्ष घालायला हवे,” असे रामदास कदम म्हणाले.
“माझं आणि मुलाचं तिकीट कापण्यासाठी अनिल परबांचे प्रयत्न”, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप!
दरम्यान, “रामदास कदमला राजकारणातून संपवण्याचा डाव शिवसेनेमधल्या काही नेत्यांचा आहे. अनिल परब यांनी वांद्रे येथून निवडून येऊन दाखवावे. तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत असाल याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेना नेत्याला आणि त्याच्या मुलाला संपूर्ण राजकारणातून कायमाचे संपवायचे. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून अनिल परब राष्ट्रवादीच्या नेत्यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यानंतर योगेश कदमबाबत सुडाची भावना बाळगली. दोन वर्षामध्ये अनिल परब यांनी माझ्या मुलाचा एकही फोन उचलला नाही. अनिल परबांनी तिथे मनसेच्या वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठीशी घालण्याचे काम केले,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.