एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारण वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे असे म्हणत शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
“आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात,” असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. यावरुन शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्वीट करत आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? का असा सवाल केला आहे.
“जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,” असे टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेना भवनावर पार पडलेल्या शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानामध्येही शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबत भाष्य केले आहे. “शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.