देशात तीन लोकसभा आणि २९ विधानसभेच्या जागांवर झालेल्या निवडणुकांचे समोर येत आहेत. यामध्ये शिवसेना ही दादरा नगर हवेली येथे आघाडीवर आहे. या विजयाच्या उंबरठ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा निकाल ऐतिहासिक असणार आहे असे म्हटले आहे. यासोबत संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे त्याचा शेवट आम्हीच करणार असा इशारा भाजपाला दिला आहे.

“महाराष्ट्राबाहेर पहिली जागा जिंकण्याचे काम शिवसेना दादरा नगर हवेलीमध्ये करत आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आणि गुजरातच्या सीमेजवळ असणारा हा निकाल ऐतिहासिक असणार आहे. तिथूनच देशाच्या राजकारणाचा दरवाजा उघडतो. देगलूरला सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते जिंकणार आहेत,” असे संजय राऊत यांनी टीव्ही ९सोबत बोलताना म्हटले आहे.

“हे निकाल असे सांगत आहे की २०२४ साली केंद्रामध्ये परिवर्तन होणार आहे. त्यावेळी आज जे नाचे नाचत आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पायामध्ये कोणते घुंगरू बांधायाचे आणि त्यांना कसे नाचवायचे हे आम्ही ठरवणार. हे संजय राऊत सांगत आहेत ते लिहून ठेवायचे. आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे त्याचा शेवट आम्हीच करणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपाचे नेते सोशल मीडियावर अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर आहे असे म्हणत असल्याचे पत्रकाराने विचारले. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. “तुमच्या बापाच्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत का? तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू. पण या पातळीवर आम्ही नाही उतरणार. हे बोंबलणारे भाजपाचे मूळ लोक नाहीत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही उत्तरे देऊ. हे हवसे नवसे गवसे नाचे बाहेरुन आले आहे आणि भाजपाचा झेंडा फडकवून आम्हाला दाखवत आहेत. भाजपासोबत आमचा संबंध जुना होता आणि आहे. तुम्ही भाजपाविषयी बोलू नका. आम्हाला भाजपा, संघ परिवार काय आहे हे माहिती आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Story img Loader