Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यानंतर या प्रकरणाचे राजकीय वर्तुळातही पडसात उमटताना दिसत आहेत. यादरम्यान आज (२३ डिसेंबर) महायुती सरकारमधील दोन नेते उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी या कुटुंब राहात असलेल्या घरासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांना उत्तर देताना संजय शिरसाट यांनी आपण या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले असल्याची माहिती दिली.
संतोष देशमुख यांच्या कुटुंब राहात असलेल्या घराची स्थितीबद्दल बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, “पूर्वजांनी जवळपास १९८० साली बांधलेलं घर आहे. आताही त्याची दुरावस्था पाहिली तर त्यामध्ये फक्त एक छोटासा फॅन आहे. घरातील लाइटसुद्धा पूर्ण लागलेली नाही. या अवस्थेमध्ये अठराविश्व दारिद्र्य घरामध्ये आहे, तरीदेखील समाजासाठी त्या व्यक्तीने वाहून घेतलं ही फार मोठी गोष्ट आहे”.
पुढे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला नवीन घर बांधून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे का? या प्रश्नावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “शासकिय मदत जी येईल ती येईल. परंतू एकनाथ शिंदे यांनी काही मदत उदय सामंत आणि माझ्याकडे पाठवली आहे, ती आम्ही त्यांना सुपूर्द केली आहे. सरपंच परिषदेचे लोक आले आहेत ते देखील काही मदत करत आहेत. त्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी आम्ही पण घेतली आहे, पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. जी काही मदत लागेल ती आम्ही करणार आहोत”, असेही शिरसाट यावेळी म्हणाले. ते टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली होती. फडणवीस म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढवी लागणार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण पाहिली तर एका कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, काही लोक यासंदर्भातील कामे आम्हाला द्या किंवा आम्हाला खंडणी द्या अशा परिस्थितीत वावरताना दिसतात. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान पवन चक्कीच्या कंपनीचं ऑफीस असलेल्या ठिकाणी या घटनेतील आरोपी गेले. त्यानंतर त्यांनी एका सुरक्षारक्षकाला आणि एका कंपनीच्या मॅनेजरला मारहाण केली. त्यानंतर मॅनेजरने तेथील सरपंचाना फोन केला. त्यानंतर सरपंच यांच्याबरोबर काही लोक आले मग त्यांनी त्या आलेल्या लोकांना बाचबाची केली. यानंतर ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख हे त्यांच्या गाडीतून जात असताना काळ्या रंगाच्या दोन गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि संतोष देशमुख यांची गाडी थांबवून त्यांना मारहाण. त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ हा आरोपी विष्णु चाटेच्या संपर्कात होता. तेव्हा आरोपी सांगत होता की १५ मिनिटात सोडतो. मात्र, त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही आणि त्यानंतर मारहाणीत देशमुख यांचा मृत्यू झाला”.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणी असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.