महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांनी जशी शिवसेना सांभाळली तसंच ते राज्यही सांभाळतील, असं म्हटलंय. तसंच शपथ घेतल्यानंतर खूप काम करावं लागतं आणि उद्धव ठाकरे ते योग्यरित्या करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“राज्याचं काम पाहणं आणि पक्षाचं काम पाहणं यात फरक आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षाचं काम पाहिलं. शिवसेना पुढे नेली तिच प्रथा ते अंमलात आणतील आणि ते यशस्वी मुख्यमंत्री होतील,” असंही मनोहर जोशी यावेळी म्हणाले. “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी नेमण्याचा जो निर्णय घेण्यात तो अतिशय योग्य निर्णय आहे. ते अनेक ठिकाणी यशस्वी झाले आहेत. तसंच ते मुख्यमंत्री म्हणूनही यशस्वी होतील,” हा विश्वास असल्याचे ते म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस
“शिवाजी पार्क ही आमचं आवडतं ठिकाण आहे. माझा शपथविधीही वेगळ्या प्रकारे शिवाजी पार्कमध्येच झाला होता. त्यावेळी अटीतटी नव्हती. शिवसेना भाजपा त्यावेळी एकत्र होते. जी व्यक्ती ही शपथ घेते त्याला खूप काम करावं लागतं. उद्धव ठाकरे ते करतील याची मला खात्री आहे,” असंही मनोहर जोशी यावेळी म्हणाले. “पाच वर्षे काय त्यापुढेही हे सरकार चालेल. सरकार कसं आहे आणि कसं काम करतं हे परमेश्वराच्या हाती असतं. आपण मेहनत, कष्ट करावे आणि परमेश्वराची प्रार्थना करावी,” असं त्यांनी नमूद केलं.