जालना : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत विकासकामांना निधी देताना डावलण्यात येत असल्याचा आरोप करून शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच भाजपचे पालकमंत्री अतुल सावे यांना घेराव घालून अडवले आणि जाब विचारत घोषणाबाजी केली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि ढकलाढकली झाली. तालुका जालना पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाची बैठक घेण्यात आली. सावे बाहेर पडेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंदच ठेवण्यात आले.
तालुका जालना पोलिसांनी शिवसेनेचे (शिंदे) जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आणि मोहन अग्रवाल, जिल्हा उपप्रमुख संतोष मोहिते, योगेश रत्नपारखे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तालुका जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निवळली. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंदाबादच्या घोषणा दिल्या. जमावबंदी भंग केल्याबाबत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक सचिन सांगळे यांनी सांगितले.
यासंदर्भात भुतेकर यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत निधी वितरीत करताना पालकमंत्री सावे शिवसेनेवर (शिंदे) अन्याय करीत असून वरिष्ठ पातळीवर ठरलेल्या सूचनांचे पालन करीत नाही. अनेकदा बोलूनही सावे आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमचा पक्ष राज्यात सत्तेत असूनही विकासकामांच्या निधीत आम्हाला सहभागी करवून घेतले जात नाही. ठरल्यानुसार जिल्हा नियोजित समितीच्या सदस्यपदी आमच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेण्यात येत नाहीत. त्याचप्रमाणे तालुका पातळीवरील शासकीय समित्यांच्या सदस्यांच्या नियुक्त्याही पालकमंत्री करीत नाहीत. पालकमंत्री सावे जाणूनबुजून शिवसेनेकडे (शिंदे) दुर्लक्ष करीत असल्याने आमच्या कार्यकर्त्यांत त्यांच्याविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. या रोषातून जिल्हा नियोजन समिती बैठकीस आलेल्या सावे यांना विचारणा केली असता त्यांनी व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि घोषणा देण्यास सुरुवात झाली.
पालकमंत्री सावे यांनी या संदर्भात वार्ताहरांना सांगितले की, शिंदे गटासाठी १४ कोटींची निधी दिला आहे. निधी पक्षासाठी नसतो तर लोकप्रतिनिधीसाठी असतो. तरीही सत्तेतील सहकारी म्हणून निधी दिला आहे. जिल्हा नियोजन समितीमधील सदस्य नियुक्त्यांबद्दल आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण आता आमच्यासोबत अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षही आलेला आहे.
अर्जुन खोतकर पोलीस ठाण्यात
ताब्यात घेतलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शिवसेनेचे (शिंदे) उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खोतकर म्हणाले, जिल्हा नियोजन समितीचे निधी वितरण करताना पालकमंत्र्यांकडून भेदभाव होत असल्याची आमच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. पालकमंत्री आपल्याकडे दुर्लक्ष करतात, या भावनेतून पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले होते. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. पुण्यावरून येत असताना या संदर्भातील माहिती मिळाली आणि त्यानंतर ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात येऊन भेट घेतली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, असे खोतकर म्हणाले.