Bharatshet Gogawale On Sunil Tatkare : महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाही झाल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पदातून डावलण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भरत गोगावलेंना पालकमंत्री पद न दिल्यामुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखत आंदोलन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दुसऱ्यांनी सुसंस्कृतपणा आम्हाला सांगण्याची गरज नाही, एक दिवस त्यांच्या सुसंस्कृतपणाचा पाढा वाचू’, असा अप्रत्यक्ष इशारा भरत गोगावले यांनी तटकरेंना दिला आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कारण आम्ही नियमाचं पालन करणारे लोक आहोत. आम्हाला एवढ्या मोठ्या मतांनी लोकांनी निवडून दिलं. त्यामुळे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले आहेत. कारण गेल्यावेळी एकनाथ शिंदेंच्या एका इशाऱ्यावर आम्ही थांबलो. आता त्यांनी आम्हाला मंत्रिपद दिलं”, असं भरत गोगावले यांनी म्हटलं. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

सुनील तटकरेंच्या विधानावर काय म्हणाले?

“आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्हालाही तारतम्य आहे. पण जे सुसंस्कृतपणाचं बोलले त्यांनी आधी हे पाहवं की आपण तीन आमदारांना जिंकून आणण्यासाठी की पाडण्यासाठी प्रयत्न केले? कारण जेव्हा त्यांची निवडणूक लागली तेव्हा आम्ही जीवाचं रान केलं. सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करत काम केलं. लोकसभेला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची जागा महाराष्ट्रात कुठेही निवडून आली नाही. पण शिवसेना शिंदे गट आणि भाजपामुळे रायगडची जागा निवडून आली हे कोणालाही नाकारता येणार नाही”, असं मोठं विधानही भरत गोगावले यांनी केलं.

“लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तटकरेंना मदत केली. पण विधानसभेच्या निवडणुकीत मी निवडून आलो तर मी मंत्री होईल आणि मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री पदावर दावा करेन, म्हणून त्यांनी मदत केली नाही. महायुतीचा धर्म निभावला गेला नाही. पण भाजपाच्या लोकांनी आमचं काम केलं. रायगडचं पालकमंत्री पद कसं निवडलं गेलं? याबाबत मला खोलात जाऊन सांगता येणार नाही. आम्ही सरळ चालणारी मंडळी आहोत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आम्ही पुढे जात आहोत. एकनाथ शिंदे जे ठरवतील आणि देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला अजूनही मान्य असेल. कारण महाराष्ट्राला कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही करतो. तसेच हिंदुत्व हे आमचं रक्त आहे, ते आम्ही कुठेही ढळू देणार नाहीत हे लक्षात ठेवावं. तसेच दुसऱ्यांनी सुसंस्कृतपणा आम्हाला सांगण्याची गरज नाही, आम्ही एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा वाचू”, असा इशारा भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांना दिला.

Story img Loader