Ramdas Kadam on Ajit Pawar: विधानसभेचा निकाल लागल्यापासून (२३ नोव्हेंबर) शिवेसनेकडून (शिंदे) मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला जात होता. शिवसेनेचे नेते प्रसारमाध्यमांसमोर येऊन एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी प्रतिक्रिया देत होते. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेतेही आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून मागणी करत होते. पण अखेर दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच राहिल, असे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर आता शिंदे गटाकडून अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी झी २४ तास वृत्तवाहिनीशी बोलत असताना अजित पवार यांच्यावर टीका केली. याआधी जेव्हा २०२३ साली अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतले होते, तेव्हाही आमच्या लोकांना मंत्रिपद मिळाले नाही, असे म्हणत कदम यांनी अजित पवारांवर टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांमुळे आमची ताकद कमी झाली

रामदास कदम म्हणाले, “भाजपाच्या लोकांना देवेंद्र फडणवीस आणि आमच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. अजित पवार हे तर शरण गेले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर त्यांनी संपवली, हा भाग वेगळा.” अजित पवारांमुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्यात अडचण येणार असल्याचे रामदास कदम यांनी या विधानातून ध्वनित केले आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदावरून कुणी, कितीही, काहीही प्रयत्न केले तरी आमची महायुती अभेद्य राहणार आहे.

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं. आता झुकते माप कुठे टाकायचे, हे पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे”, असेही रामदास कदम म्हणाले.

भाजपाचा प्लॅन ‘बी’

२०२२ साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन ४० हून अधिक आमदारांसह भाजपाशी हातमिळवणी केली. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपाने २०२३ साली अजित पवारांनाही सत्तेत सामील करून घेतले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची पंचाईत झाली. आताही विधानसभेच्या निकालानंतर भाजपाकडे १३२ अधिक पाच अपक्ष आमदार असे १३७ चे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४१ यापैकी कुणाचीही साथ घेतली तरी सरकार चालवणे सोपे होणार आहे. याची जाणीव महायुतीमधील सर्वच पक्षांना आहे.