महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात उघड नाराजी व्यक्त करत आहेत. नुकतेच त्यांनी अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना आपल्या घरी चहासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावरून ते महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला जात होता. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर आहेत, तोपर्यंत महायुतीमधून बाहेर पडणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केलेली असली तरी शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना एक सल्ला देण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांना एक सल्ला दिला. तसेच दरवेळी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणे योग्य नसल्याचे यांनी म्हटले.
संजय शिरसाट म्हणाले, “बच्चू कडू त्यांच्या पद्धतीने बोलत असतात. ते कधी जरांगे पाटलांना भेटतात तर कधी शरद पवारांना भेटतात. त्यांना वाटते की, त्यांच्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात. त्यांना जास्त जागा मिळाल्या तर आम्हाला आनंदच आहे. परंतु या सर्व गोष्टी दरवेळी कॅमेरासमोर येऊन बोलणे मला उचित वाटत नाही. परंतु ज्याचा त्याचा स्वभाव असतो. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी निश्चितच घेतली असेल.”
हे वाचा >> “एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत…”, बच्चू कडूंचं मोठं विधान; काय असेल महायुतीचं भवितव्य?
शरद पवार यांना भेटीचे निमंत्रण दिल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी महायुतीबाबत भाष्य केले, ज्यानंतर शिंदे गटाकडून वरील प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. बच्चू कडू म्हणाले, आमच्या पक्षाचे कुठे भले होईल, त्यानुसार आम्ही विचार करू. जिथे आमचे राजकीय अस्तित्व मजबूत होईल, तिथे युती किंवा आघाडी केली जाईल.” तसेच जर सरकारमधून बाहेर पडण्याची वेळ आली तर विधानसभेच्या कोणत्या जागांसाठी आग्रह धरणार, याविषयीही त्यांनी सूतोवाच केले. “आम्ही एक-दोन जागांसाठी काही करणार नाही. तीन-चार जागा मिळणार असतील तरच महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार करू. नाहीतर तसे काही करण्यात अर्थ नाही”, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान संजय शिरसाट यांनी बच्चू कडू यांच्याव्यतिरिक्त अनेक विषयांवर भाष्य केले. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उदघाटनाकडे आम्ही देशाचा मोठा उत्सव म्हणून पाहतो आहोत. यासाठी मुख्यमंत्री पक्ष संघटनेतील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असून हा सोहळा कसा साजरा करायचा? याबाबत सूचना देऊन नियोजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी राम मंदिराचा सातबारा भाजपाच्या नावावर नाही, अशी टीका केली होती. या टीकेचा समाचार घेत असताना संजय शिरसाट म्हणाले की, राम मंदिर हे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या अभिमानाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. हा काही मुंबईचा महापौर बंगला नाही. ज्याचा कब्जा काही लोकांनी केला. राम मंदिरावर कुणाचाही कब्जा नाही, सर्व भक्तांसाठी खुले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारख्या व्यक्तीने टीका केली तरी त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही.
म्हणून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलत असताना संजय शिरसाट म्हणाले की, राज ठाकरे यांचा मुड असतो. त्यानुसार त्यांच्या डोक्यात जेव्हा महाराष्ट्राच्या हिताच्या काही कल्पना येतात. तेव्हा मुख्यमंत्र्यांसमोर त्या मांडतात. कुणी महाराष्ट्राच्या हिताचे सल्ले देत असेल तर ते ऐकण्याचे काम मुख्यमंत्री करत आले आहेत. त्यामुळेच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली असावी. या भेटीदरम्यान मनसेसह कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.