मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील मराठा मोर्चाला संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी झटत असल्याचे दिसले. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध करत असल्यामुळे ते मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत. आता खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाकडूनही छगन भुजबळ यांना आव्हान देण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा होत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी भुजबळ यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मनोज जरांगे पाटील यांच्यात हिमंत असेल तर..”, छगन भुजबळ यांचा थेट इशारा

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. “छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात?”, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत टीका केली.

भुजबळांच्या राजीनाम्याने सरकारला फरक पडत नाही

मागच्या ७० वर्षांत मराठा समाजाच्या नोंदी दाबून ठेवल्या त्यामुळे समाजाचे नुकसान झाले. जर मराठा समाजाच्या नोंदी मिळत असतील तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असेही संजय गायकवाड म्हणाले. तसेच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. त्यांच्या एका मंत्रिपदाने सरकारला काहीही फरक पडत नाही. त्यांची बूमिका ही सरकारची भूमिका नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका नाही, असाही आरोप संजय गायकवाड यांनी केला.

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार; रायगडावरून सरकारला दिला इशारा, नेमकं कारण काय?

सरकारमध्ये राहून सरकार आरोप करू नये

संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. संजय गायकवड यांचे वक्तव्य वैयक्तिक असले तरी मराठा आरक्षण आणि ओबीसी यांचा विषय वेगळा आहे. काही लोक राजकारण करण्यासाठी एखाद्या समाजाची ढाल घेत आहेत. अशा राजकारणामुळे दोन्ही समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे. पत्रकार परिषद घेऊन जर सरकारवरच आरोप केले जात असतील तर त्यांचा राजीनामा मागून काहीही चुकीचे झाले नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.

महाराष्ट्रातील वातावरण चिघळले

दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “अध्यादेश जाहीर झाल्यानंतर छगन गावागावत सध्या उन्मादाचे वातवरण दिसत आहे. रात्रीच्या तीन-तीन वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट सुरू आहे. जिथे ओबीसी वस्ती आहे, तिथे अधिक उन्माद करण्यात येत आहे. आम्ही मुंबईवरून आरक्षण घेऊन आलो आहोत, हा विजयी उन्माद साजरा केला जात आहे. डीजेवर मला शिवीगाळ करणारी गाणी वाजवली जात आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे. राज्यात दुर्दैवाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे”, अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde faction mla aggressive on chhagan bhujbal demands removal from ministry kvg