Shiv sena wants Home ministry: एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत, हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांची राज्यात कॉमन मॅन अशी ओळख झाली आहे. हे सोडून ते दिल्लीत जाणे शक्य नाही. तसेच उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय ते आज संध्याकाळ पर्यंत जाहीर करतील, असा मला अंदाज असल्याचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. तसेच आजच्या घडीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमके कोण होणार? याबद्दलचे स्पष्टीकरण झालेले नाही, असेही ते म्हणाले. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेने (शिंदे) गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट यांनी गृहखात्याबद्दल शिवसेना (शिंदे) आग्रही असल्याचे म्हटले.
महाराष्ट्रात शांतता राखणारा गृहमंत्री हवा
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, महायुतीच्या विजयात शिवसेनेचा वाटा मोठा आहे. त्यामुळे आम्हाला खाती देताना निश्चितच विचार करावा लागेल. गृहखाते देण्यास भाजपाचा विरोध का आहे, याची मला कल्पना नाही. पण गृहखाते शिवसेनेकडेच असले पाहीजे, अशी आमची मागणी आहे. मागच्या काही काळात राज्यात दंगली झालेल्या आहेत. जाती-जातींमध्ये आंदोलने होत आहेत. ओबीसी-मराठा यांचे आंदोलन हाताळण्यात कसब पणाला लावावे लागेल. महाराष्ट्रात शांतता ठेवण्याची गरज असून हा कारभार शिवसेनेने सांभाळला पाहीजे, अशी अपेक्षा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
हे वाचा >> ‘भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळफास होतो’, एकनाथ शिंदेंचं असंच होईल का?
एकनाथ शिंदे फकीर टाईप माणूस
मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यामुळे राज्य मंत्रिमंडळात आता दुय्यम भूमिका स्वीकारण्यास एकनाथ शिंदे तयार होतील का? असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे फकीर टाईप माणूस आहेत. ते काय सोडतील, काय घेतील? याचा काहीही अंदाज बांधता येत नाहीत. कदाचित ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारही नाहीत. कदाचित स्वीकारतीलही किंवा फक्त पक्षाचे प्रमुख म्हणून राहतील. म्हणून त्यांचा कोणताही अंदाज बांधता येणार नाही.
जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तरी शिवसेनेकडे एक उपमुख्यमंत्रीपद राहणारच, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले. ते म्हणाले, शिंदे जर उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसतील तर ते पद पक्षातील इतर नेत्याला दिले जाईल. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ते आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्रीपदावरचा आमचा दावा संपलेला नाही. भाजपाला कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आम्ही तो निर्णय भाजपाच्या पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे.