राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र, मनोज जरांगे यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. यातच आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला विरोधी पक्ष उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या बैठकीत ठोस काही निर्णय झाला नाही. यानंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली.
शरद पवार यांना मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यसाठी छगन भुजबळ यांनी विनंती केली. तसेच तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे इतर कोणापेक्षा तुम्हाला महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीची जास्त जाण आहे, असं सूचक विधान छगन भुजबळांनी केलं होतं. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपवून घेणार नाही”, असं सूचक विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? त्यांनी नेमकं कोणाला इशारा दिला? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा : OBC Reservation : “…तर मी राजीनामा देईन”, छगन भुजबळ असं का म्हणाले? ओबीसी आरक्षणाबाबत म्हणाले…
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
“राज्यात मराठा समाज आपला मोठा भाऊ आहे. त्यांचीही आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती बिकट आहे. तसेच शैक्षणिक परिस्थिती किंवा त्यांनाही नोकऱ्यांमध्ये अडचणी येत आहेत. आता या अडचणी दूर व्हव्यात यासाठी मनोज जरांगे लढत आहेत. त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच ओबीसींनाही वाटतं की आपला हक्क कोणाकडे जाऊ नये. त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी यांच्या दोघांची ही हक्काची लढाई आहे. मात्र, मराठा समाज आणि ओबीसींना त्यांचा हक्क देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, असा विश्वास आहे”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.
तर आम्ही खपवून घेणार नाही
मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या प्रश्नासंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, “आमच्या महायुतीमधील मंत्री असतील किंवा नसतील. मला त्याबाबत जास्त काही भाष्य करायचं नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना जे कळतं ते दुसऱ्यांना कळत नाही. एवढा मोठा उठाव केल्यानंतर एका सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा गोरगरीबांवर विश्वास प्राप्त करतो. याचा अर्थ त्यांना सर्व कळतं. सर्व काही कळतं म्हणूनच ते १८-१८ तास काम करतात. मात्र, त्यांच्या विरोधात जे कोणी बोलले त्यांनाच काही कळत नाही, असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणीही काही बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता कधीही खपवून घेणार नाही”, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला.
© IE Online Media Services (P) Ltd