Bharatshet Gogawale On Sunil Tatkare : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या मंत्र्‍यांमध्ये धूसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत चांगलंच राजकारण तापलं. त्यानंतर अखेर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर आता भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून खासदार सुनील तटकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘लोकसभेच्या निवडणुकीत जर आमच्या हातातून एक जरी चूक झाली असेल तर मंत्रि‍पदाचा राजीनामा देतो. पण एक तरी चूक दाखवून द्यावी’, असं आव्हान मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना दिलं आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद चांगलाच विकोपाला गेल्याची चर्चा रायगडच्या राजकारणात आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

“आमची तयारी आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? मी आज आव्हान देतो, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर आमच्या हातातून एक जरी चूक झाली असली तरी आज लाडक्या बहि‍णींच्या समोर सांगतो, मंत्रि‍पदाचा राजीनामा देतो. ज्यांनी आमच्या चुका सांगितल्या ना, त्यांनी आमची एक तरी चूक दाखवून द्यावी”, असं खूलं आव्हान मंत्री भरत गोगावले यांनी दिलं आहे.

दरम्यान, भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं होतं. मात्र, अद्याप रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार? यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group leader bharatshet gogawale on sunil tatkare open challenge in raigad guardian minister politics gkt