Deepak Kesarkar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. आता या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. राज्यात कोणाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुती? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
अद्याप निकालाला एक दिवस बाकी असतानाच राजकीय नेत्यांकडून सरकार स्थापनेबाबात दावे करण्यात येत आहेत. काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीला अपक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही, असा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत किती अपक्ष उमेदवार निवडून येतात? आणि ते कोणाला साथ देतात? हे देखील महत्वाचं असणार आहे. पण या पार्श्वभूमीवर बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी निकालाच्या आधीच सत्ता स्थापनेबाबत मोठं विधान केलं आहे. “गरज पडल्यास अपक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करू”, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा : निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
दीपक केसरकर काय म्हणाले?
“निकाल लागल्यानंतर आम्ही सर्वजण पाहू की आम्ही महायुती म्हणून सरकार बनवू शकतो का? किंवा गरज पडली तर आम्ही अपक्षांना बरोबर घेऊ आणि सरकार बनवू. तसंही निवडणुकीत १० ते १५ अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांच्या या विधानाच्याआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनीही सरकार स्थापन करण्यासंदर्भात मोठं विधान केलं होतं. त्यामुळे सध्या निकाल जाहीर होण्याच्या आधीच पडद्यामागे राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही सरकारस्थापनेबाबत सूचक विधान केलं. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही आणि त्यांना दुय्यम भूमिका निभावावी लागली तर काय करणार? असा प्रश्न संजय शिरसाट यांना टिव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले, “यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील.” तसेच निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार यांच्याबरोबर गेले तर? असा प्रश्न विचारला असताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “एकनाथ शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्याबरोबरच जाऊ.” दरम्यान, त्यांच्या या सूचक विधानाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.