Neelam Gorhe on Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली बंड केल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्याबरोबर आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याही काही काळाने शिंदे गटात सामील झाल्या होत्या. तसेच शिंदेंबरोबर कायम राहिलेले बच्चू कडू हे आता त्यांची साथ सोडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रत्येक पक्ष आपापले मतदारसंघ आणि उमेदवार निश्चिती करत आहे. उमेदवारही या पक्षातून त्या पक्षात जाण्याची तयारी करत असताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेले एक विधान सध्या चर्चेत आहे. “पत्रकारांनी अलर्ट राहावे, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल”, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

सोलापूर दौऱ्यावर आल्या असताना गोऱ्हे म्हणाल्या की, राज्याचे राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही सर्व लोक निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची आमची युती खूप जुनी आहे. पण पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते.

हे वाचा >> Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”

अजित पवार स्वतंत्र लढणार का?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार का? असा प्रश्न यावेळी गोऱ्हे यांना विचारण्यात आला. पण त्यांनी हसून यावर उत्तर देणे टाळले. त्या म्हणाल्या, “मी असा कोणताही दावा केलेला नाही. माझ्या तोंडी हे शब्द घालू नका. पण राजकारण बदलत आहे. काही जण अचानक निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं सांगतात. मग सांगतात मुलाला उभं करणार. मुलगा काहीतरी वेगळं बोलतो. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते. पण ते मंत्रालयात जाळीवर उडी मारण्यापर्यंत आंदोलन करतील, असं कधी वाटलं नव्हतं.”

त्यांच्याबाबत संशय निर्माण करू नये

आपल्या विधानावर राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या, मागच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र होते. त्यामुळे त्यांच्याबाबत (अजित पवार) सारखं सारखं काही बोलत राहणं हे संशय निर्माण करण्यासारखं होईल. अजित पवार आपल्या भावना वेळोवेळी व्यक्त करतात. पण आम्ही एकसंघपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठीशी आहोत.