लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामधून छगन भुजबळ हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र, त्यांनी अचानक या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. मात्र, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली.

अशातच छगन भुजबळ यांनी महायुतीच्या धोरणाविरोधात अनेकदा भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेविषयी बोलताना मोठं विधान केलं आहे. “छगन भुजबळ यांच्या भूमिका काहीवेळा गोंधळलेल्या असतात. त्यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये चलबिचल आहे”, असं सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं.

हेही वाचा : “भाजपावरील नाराजीचा आम्हाला फटका”, अजित पवार गटाचं वक्तव्य; महायुतीत बिनसलं? RSS चा उल्लेख करत म्हणाले…

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

“छगन भुजबळ यांच्या भूमिका काहीवेळा गोंधळलेल्या असतात. त्यांच्या भूमिका कन्फ्यूज का असतात ते त्यांनाच माहिती. मात्र, आजकाल ते उबाठा गटाचीही पाठराखण करायला लागले आहेत. आता त्यांची भूमिका काय असली पाहिजे? काय नसली पाहिजे? हा त्यांचा निर्णय आहे. पण दररोजच्या त्यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये निश्चतच थोडीशी चलबिचल आहे, हे मान्य करावं लागेल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चांवर अनेकदा प्रतिक्रिया देत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलेले आहे. “छगन भुजबळ नाराज नाहीत. ते कुठेही जाणार नाहीत, सुरु असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनीही काही दिवसांपूर्वी दिली होती.

ऑर्गनायझरच्या लेखाबद्दल भुजबळ काय म्हणाले होते?

अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपाचं नुकसान झालं का? ऑर्गनायझरमधील लेखाबद्दल भुजबळ म्हणाले म्हणाले होते, “होय, त्यांनीच नाही तर अनेकांनी टीका केली. काँग्रेसच्या लोकांना बरोबर घेतल्याने नुकसान झाल्याचंही म्हटलं. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. आम्हालाही बरोबर घेतलंय. ऑर्गनायझरची जी भूमिका आहे ती एकंदरीत योग्य आहे.” असं छगन भुजबळांनी मांडली होती. त्यांच्या या उत्तराने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या वक्तव्यामुळे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या वक्तव्यांमुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत.