लोकसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र, अद्यापही महायुतीमध्ये नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या जागेचा तिढा सुटण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यात भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या विधानांनी दिवसेंदिवस भर पडत आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य करत नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला छुपा पाठिंबा असल्याचे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. तर त्याआधी मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्यावर धक्के बसले. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सूचक विधान केल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…

संजय शिरसाट काय म्हणाले?

“काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा आणि शिवसेनेला छुपा पाठिंबा आहे. मात्र, फक्त पक्षाचे नाव असल्यामुळे ते तसे दाखवत नाहीत. काँग्रेसमध्ये कुठेही एकवाक्यता नव्हती, त्यामुळे त्यांचा पाठिंबा कायम असतो. त्यामुळे आम्ही नेहमी सांगत होतो की, काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. आताही काहीजण छुपा पाठिंबा देत असून लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होईल”, असे सूचक विधान संजय शिरसाट यांनी केले.

महायुतीच्या जागावाटपाबद्दल काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर प्रदीर्घ बैठक घेतली. सर्व जागा निवडून आणण्यासंदर्भात चर्चा झाली. आता बैठका कमी होत असून शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडेच राहणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणनीती आखली गेली आहे. महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. महायुतीमध्ये तिढा नाही. १६ ते १८ जागा लढण्याची तयारी आमची होती, १६ पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार असून उमेदवार कमजोर असेल तर जागा बदलता येईल”, असे शिरसाट म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group leader sanjay shirsat big statement on congress and maharashtra politics gkt
Show comments