Eknath Shinde, Maharashtra Government Formation: राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यासाठी मुंबईत येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान सत्तास्थापनेबाबत एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री मात्र त्यांच्या सातारा येथील दरे गावी होते. आज ते मुंबईत परतणार असल्याची चर्चा आहे. गेले दोन दिवस ते आजारी असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्याचे समजते. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या गावभेटीवरून टीका केली होती. त्याला आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा विषय आमच्यासाठी संपला

“एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते. काल त्यांचा ताप १०५ वर होता. सत्तेचे समीकरण आता निश्चित झाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत येऊन आराम करतील. त्यानंतर उद्या शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर शिवसेनेचा कृती आराखडा ते सांगतील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदाबाबत आमच्याकडून विषय संपलेला आहे. आता गृह, महसूल किंवा इतर खात्यांबाबत महायुतीत कोणतीही भांडणे सुरू नाहीत. महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

हे वाचा >> “शिंदेंना डॉक्टरची नव्हे मांत्रिकाची गरज”, ‘अमावस्ये’वरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा; म्हणाले, “प्रकृती नाजूक असल्याने मंत्र्यांना…”

दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली होती. शिंदेंच्या प्रकृतीवरूनही ते उपरोधिक बोलले होते. या टीकेचा समाचार घेताना संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हे माणुसकी नसलेले व्यक्ती आहेत. शिंदे यांच्या प्रकृतीची काळजी करण्याऐवजी ते जादूटोण्याची भाषा बोलत आहेत. त्यांना संस्कृती आणि संस्कार नाहीत. संजय शिरसाट पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी केलेल्या जादूटोण्यावरच उतारा करण्यासाठी आम्ही दरे गावात गेलो होतो. बंगालच्या जादूगाराचीही जादू आमच्यावर चालली नाही, हेही राऊतांना माहीत आहे.

हे ही वाचा >> Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट! ताप, सर्दी अन् घशाचा संसर्ग, सलाईनही लावली; डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती!

दाढीला हलक्यात घेऊ नका

एकनाथ शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा राज्यात मोठी घडामोड घडते, असे विधान शिरसाट यांनी केले होते. त्यावर आज पुन्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले, दाढीला कुणीही हलक्यात घेऊ नये. दाढीने विधानसभेला आपली कमाल दाखविली. जे रोज उठून शिंदेवर टीका करतात, त्यांना जागा दाखवली. राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसला शिंदेंनी जागा दाखविली. ही ताकद दाढीमध्ये आहे. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊन नका, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.