देशात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच टप्प्यांत मतदान पार पडले. आता आणखी दोन टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडलेले आहे.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेसने स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी यावरून काँग्रेसला इशारा दिला होता. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर खोचक शब्दात टीका केली आहे. “आमची भूमिका मान्य केली असती तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“सांगलीच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली ती वस्तुस्थिती होती. अनेक ठिकाणी आम्ही सांगायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्याबरोबर राहणार नाही. आता त्याचा अनुभव त्यांना सांगलीत आला. त्यांच्या सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की, काँग्रेसने आम्हाला धोका दिला, त्याला सपोर्ट करायला राष्ट्रवादी होती. यापुढे आम्ही त्या पक्षाला विधानसभेची पायरी चढू देणार नाही, भलेही आमच्या पक्षाने कारवाई केली तरी, असं ते जिल्हाप्रमुख म्हणाले. अशीच भूमिका आमचीही होती. आमच्या त्या भूमिकेला सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी पुष्टी केली”, असं संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा : “डोबिंवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार”; अंबादास दानवेंचा आरोप; फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
“एकाच मतदारसंघात नाही तर अनेक मतदारसंघात असे प्रकार घडले आहेत. या लोकसभा निवडणुकीचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आणि काँग्रेसला होणार आहे. ठाकरे गटाची वाताहात करण्याचं काम संजय राऊत यांच्यासारख्या माणसांनी केलं. त्याचा परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना फायदा म्हणून झाला. मुळामध्ये जो शिवसैनिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात लढत राहिला. मात्र, आता लाचारासारखं त्यांच्याबरोबर जावं लागलं हे दुर्देव आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
“ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर आलेलं संकट पाहता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनाही मनस्थाप होत आहे. जर एकत्रितपणे काम केलं असतं आणि आमची भूमिका मान्य केली असती तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती. सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी केलेलं विधान हे खऱ्या अर्थाने मार्ग दाखवणारे विधान आहे”, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.