विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. तसेच आपल्या पक्षाचे मतदान फुटू नये, यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे? याचं मार्गदर्शनही आमदारांना करण्यात आलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता आज सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत विधानभवन परिसरात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. असे असतानाच विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक सूचक विधान केलं आहे. “बारावा खेळाडू मिलिंद नार्वेकर यांना कमजोर समजू नका”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : “विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…”, रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

संजय शिरसाट म्हणाले?

“विधानपरिषदेच्या निवडणुकीत १२ वा उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे. मात्र, मॅच फिक्सिंग कोण करतंय? याकडे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील, शिवसेना शिंदे गटाचेही सर्वजण निवडून येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही सर्व उमेदवार निवडून येतील. मग फूट कोणात पडेल? काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात फूट पडेल. पण तरीही धक्का कोणाला बसेल? हे मतदानानंतरच समजेल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत १२ उमेदवारांपैकी कमजोर कोण वाटतं? या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “आता या सर्व निवडणुकीचं गणित आज समजेलच. कारण कोणी मते फोडली असतील तर ते सांगणार नाहीत. तसेच जो फुटला तोही सांगणार नाही. मग याचा निकाल कसा लागणार? तर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी हे सर्व समोर येईल. मात्र, हे निश्चित आहे की १२ वा जो खेळाडू आहे, मिलिंद नार्वेकर यांना तुम्ही कमजोर समजू नका. मिलिंद नार्वेकर कमजोर नाहीत. विधानपरिषदेची पायरी चढण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतील. याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group leader sanjay shirsat on milind narvekar vidhan parishad election gkt
Show comments