Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा आहे. असं असतानाच आता ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केला आहे. महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरे गटाचे सर्व खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय शिरसाट काय म्हणाले?

ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यात किती सत्यता आहे? असा सवाल संजय शिरसाट यांना विचारला असता ते म्हणाले, “राजकारणात अशा प्रकारे जे प्रवेश होतात त्यांचे नावं ऐनवेळी जाहीर केले जातात. मात्र, ही वस्तुस्थिती आहे की सर्व खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाने किती काहीही बोललं तरी त्यांना संपर्क करायचा तो संपर्क करत असतो. कारण पाच वर्ष विरोधात राहून काय करणार? त्यांचं उद्याचं भविष्य काय? उद्या काय घडणार हे देखील माहिती नाही. त्यामुळे सत्तेत राहिलं तर मतदारसंघासाठी कामे चांगले होतील. एवढंच नाही तर चांगलं स्थानही त्यांना मिळू शकतं. त्यामुळे सर्वजण आमच्या संपर्कात आहेत”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ठाकरे गटाचे खासदार संपर्कात आहेत. मात्र, यासंदर्भातील निर्णय कधी घ्यायचा हे उपमुख्यमंत्री शिंदे ठरवतील. निर्णय लवकरच होईल, खूप जास्त वेळ यासाठी लागणार नाही. अशा प्रकारची अवस्था फक्त ठाकरे गटातच नाही, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील आहे. महिन्याभरात राजकारणाला वेगळी कलाटणी नक्कीच मिळेल”, असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.

ठाकरे गटाचे किती खासदार संपर्कात आहेत?

“ठाकरे गटाचे किती खासदार संपर्कात आहेत याचा आकडा आत्ता सांगता येणार नाही. पण जेवढे खासदार आमच्या पक्षात येण्याच्या प्रयत्नात आहेत तेवढे येतील. काही गोष्टी आम्हाला देखील माहिती नसतात. त्यामुळे ठाकरे गटाचे किती खासदार येणार याची संख्या फक्त एकनाथ शिंदे यांनाच माहिती आहे. त्यामुळे एक महिन्यांत अनेक खासदारांचा प्रवेश होईल. ३१ जानेवारीला संसदेचं अधिवेशन सुरु होईल. त्यानंतर या सर्व घडामोडी घडतील आणि अधिवेशन संपेपर्यंत सर्व सोक्षमोक्ष लागेल. तसेच ठाकरे गटाचे काही आमदारही संपर्कात आहेत, काही माजी आमदार संपर्कात आहेत. काही पदाधिकारी आहेत. ठाकरेंच्या पक्षात जे कंटाळले आहेत ते सर्व आमच्या संपर्कात आहेत”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group leader sanjay shirsat on uddhav thackeray group mps in contact with the shinde group mahayuti gkt