Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. सध्या विविध मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा असं सर्व चित्र पाहायला मिळत आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल, यासंदर्भातही चर्चा सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री संशयी आत्मा आहेत, अशी घणाघाती टीका केली. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “तुमचं सरकार आलं तर लाडक्या बाहीण योजनेचे पैसे बंद करा. महिलांना एसटीने अर्ध्या तिकीटात प्रवास दिला जातो ते बंद करा आणि घरी बसा”, अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली.
हेही वाचा : “बदलापूरच्या घटनेनंतर माझा राजीनामा मागतायत, पण कोलकाता प्रकरणावर…”, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल
संजय शिरसाट काय म्हणाले?
“काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेसचं उपरणं घातलेले लोक आमच्यावर टीका करण्याच्या पात्रतेचे राहिले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्या टीकेला उत्तरही देणार नाहीत. आमचं सरकार फक्त आश्वासन देणारे नाही, तर काम करणारे सरकार आहे. आता संजय राऊत यांच्या बोलण्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही. ते रोज काहीतरी बडबड करतात. संजय राऊतांनी ठाकरे गटाची आणि शरद पवार गटाची वाट लावली. त्यामुळे हे वाट लावणारे लोक दुसऱ्यांना काय वाट दाखवतील”, असा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी केला.
राज्यातील विविध घटनांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला. तसेच शाळेत मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली हे वाक्य कशाला?, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “राज्यात तुमचं सरकार आल्यानंतर मुलगी शिकली प्रगती झाली हे वाक्य काढून टाका. तुमचं सरकार आलंच तर लाडकी बाहीण योजनेचे पैसे बंद करा. तुमचं सरकार आलं तर आज ज्या महिला एसटीने अर्ध्या तिकीटात प्रवास करतात ते बंद करा. तुमचं सरकार आलं तर ज्या लोकांना मोफत धान्य दिलं जातं, तेही बंद करा आणि घरी बसा. घरी बसून व्हिडीओ कॉन्फरन्सवरून सर्वांना शुभेच्छा देत बसा”, अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
© IE Online Media Services (P) Ltd