विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकल्या. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा पराभव झाला. तब्बल ५ वेळा विधिमंडळ सभागृहात सदस्य राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांच्या पराभवावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. ‘शेकापचे जयंत पाटील यांना डोळ्यांसमोर दिसत होतं की ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे मते फुटणार आहेत. पण महाविकास आघाडीने मिळून जयंत पाटील यांना बळीचा बकरा बनवलं’, असा हल्लाबोल उदय सामंत यांनी केला.
उदय सामंत काय म्हणाले?
“ठाकरे गट हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी कोणाबरोबर आघाडी आणि युती करावी, तसेच २८८ जागा लढवाव्या की फक्त ८८ जागा लढवाव्यात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. २८८ मतदारसंघाचा ते आढावा घेणार असतील तर कदाचित स्वबळावर निवडणूक लढण्याचं त्यांच्या मनात असेल. त्यामुळे ते अशी चाचपणी करत असतील. मग चाचपणी केल्यानंतर २८८ उमेदवार त्यांच्याकडे आहेत की नाही हे त्यांना समजेल”, असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला.
आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
‘केंद्रात मोठा भूकंप होईल आणि सत्ता परिवर्तन होईल’, असं विधान आदित्य ठाकरे यांनी काल केलं. त्यांच्या या विधानावर उदय सामंत म्हणाले, “दोन वर्षांपासून ठाकरे गटाचे नेते म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल. मात्र, तसं झालं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी निवडणुकीला सामोरं जात आहोत. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात येईल. त्यामुळे विरोधकांची विधानं ही फक्त कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी असतात”, अशी टीका उदय सामंत यांनी केली.
हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली”; संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकाने भाजपाला विचारले बोचरे प्रश्न
उदय सामंत पुढे म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून दोन ते तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी पाहायला मिळतील. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ज्या-ज्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या देखील सर्वांच्या समोर येतील. महायुतीला कोणी-कोणी मतदान केलं. याचे पडसादही या निवडणुकीमध्ये उमटतील. पण शेकापचे जयंत पाटील यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं. जयंत पाटील यांना डोळ्यासमोर दिसत होतं की ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मत फुटणार आहेत. पण त्यांना तुम्ही निवडून येणार आहात असा विश्वास देण्यात आला. एका चांगल्या राजकीय पक्षाला आणि चांगल्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम महाविकास आघाडीने एकत्र येऊन केलं”, असा हल्लाबोल उदय सामंत यांनी केला.
अनिल देशमुखांवर टीका
राज्यात सध्या तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. यावर बोलताना अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर टीका केली होती. तसेच भाजपा अजित पवार गटाला बेगळं लढण्याचं सांगू शकतं, असं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. सामंत म्हणाले, “तिसऱ्या आघाडीबाबत अनिल देशमुखांना कोणत्या सूत्रांकडून काय समजलं हे मला माहिती नाही. पण विधानपरिषदेला ट्रेलर पाहिला. मग आता कशाला वेगळी निवडणूक लढवायची. विधानपरिषदेत असा ट्रेलर दिसला की विधानसभेला काय होणार हे अनिल देशमुख यांनाही दिसलं असेल”, असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला.
© IE Online Media Services (P) Ltd