Bharatshet Gogawale On Sunil Tatkare : महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यापासून महायुतीमधील नेत्यांमध्ये चांगलीच धुसफूस सुरु झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पदातून डावलण्यात आलं. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर भरत गोगावले यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाही तर त्यांच्या समर्थकांनी महामार्ग रोखत खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती, त्यामुळे चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर अखेर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली. आता भरत गोगावले यांनी पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.

अशातच भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे. “खासदार सुनील तटकरे यांनी निवडणुकीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही निवडणुकीत प्रामाणिक काम केलं, पण त्यांनी प्रामाणिक काम केलं नाही”, असा आरोप भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील वाद चांगलाच विकोपाला गेल्यामुळे आता यावर महायुतीमधील वरिष्ठ काय तोडगा काढणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

भरत गोगावले काय म्हणाले?

“आम्ही व्यवहाराने चालणारे माणसं आहोत. आम्ही चुकीच्या पद्धतीने चालणारे माणसं नाहीत. आम्ही ज्या प्रमाणे निवडणुकीत काम केलं तसंच काम जर त्यांच्याकडून झालं असतं, तर त्याचा विचार केला गेला असता. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे काम करायचं. पण त्यांनी (सुनील तटकरे) आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मग ही कोणती रित? जे स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत मग ते तुमचे आणि आमचे काय होणार?”, असं म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group mla bharatshet gogawale on raigad guardian minister post and ncp sunil tatkare politics gkt