विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे मत फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आता विधानपरिषदेचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी २३ आमदारांची मते आवश्यक आहेत. पण ठाकरे गटाकडे सध्या १५ आमदार आहेत. त्यामुळे इतर मते ठाकरे गट कसे मिळवणार? हा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मिलिंद नार्वेकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मिलिंद नार्वेकर यांना सूचक इशारा दिला आहे. “तुमचा कोणी बळी देत की काय? याकडे लक्ष ठेवा”, असं शिरसाटांनी नार्वेकरांना म्हटलं आहे.

हेही वाचा : भाजप नेतृत्वाचे शिंदेंना झुकते माप? महायुतीची धुरा मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर सोपवण्याची शक्यता

संजय शिरसाट काय म्हणाले?

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देण्यात आली आहे. पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मत कशी द्यायची? यासंदर्भात फडणवीस महायुतीमधील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले, “हे एक टीम वर्क आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. या टीम वर्कमध्ये ते काम करत आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीचा ‘मॅजिक पॅटर्न’ पाहायला मिळेल”, असं संजय शिरसाट म्हणाले. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

मिलिंद नार्वेकरांना इशारा

विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मिलिंद नार्वेकर हे नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावर शिरसाट म्हणाले, “मिलिंद नार्वेकर हे आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते निवडून यावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, त्यांना मी सांगेल की तुमचा कोणी बळी देत की काय? याकडे लक्ष ठेवा. अन्यथा मिलिंद नार्वेकर हे डोक्याच्यावर चाललेत म्हणून बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न कोणी करत आहे का? यापासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे”, असं शिरसाटांनी म्हटलं आहे.

बच्चू कडूंबाबत शिरसाट काय म्हणाले?

बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणूक पाहता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. तसेच सरकारने शेतकऱ्यांबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल. त्यामाध्यमातून आम्ही १५ ते १७ जागा लढवू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. यावर संजय शिरसाट म्हणाले, “बच्चू कडू हे दरवेळी आपले आस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे सांगतील तसे ते काम करतील.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group mla sanjay shirsat on thackeray group leader milind narvekar and vidhan parishad election gkt
Show comments