राज्यात पुढील काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आतापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारच्यावतीने आगामी विधानसभा पाहता मोठ्या घोषणाही केल्या आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार संदिपान भुमरे यांनी सूचक विधान केलं आहे. ‘येत्या काळात बरेच धमाके होणार आहेत. अनेकजण संपर्कात आहेत’, असं संदिपान भुमरे यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

संदिपान भुमरे काय म्हणाले?

पैठण तालुक्यातील बिडकिन येथील सरपंचांसह अन्य काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना संदिपान भुमरे म्हणाले, “पैठण तालुक्यात शिवसेना भक्कमपणे पुढे जात आहे. या कार्यकर्त्यांना माझ्या कामाचा अनुभव होता. काही कारणास्थव ते बाजूला गेले होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम पाहून अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. येत्या काळात अजून बरेच धमाके होणार आहेत. ग्रामीण भागातील किंवा शहरातील अनेकजण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत”, असं संदिपान भुमरे यांनी म्हटलं.

हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारची दोन वर्षे, मुख्यमंत्र्यांची खास पोस्ट; म्हणाले, “महायुतीमधील पक्षांचा…”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गट राहणार नाही

भुमरे पुढे बोलताना म्हणाले, “लोकसभा निवडणुकीसंदर्भात जी परिस्थिती मी सांगत होतो, तशीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं होतं की, छत्रपती संभाजीनगरची महायुतीची जागा एक ते दीड लाखांच्या फरकाने निवडून येईन आणि ते सत्य झालं. आता विधानसभा निवडणुकीतही सर्वंच्या सर्व जागा महायुतीच्या येतील. विधानसभेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गट राहणार नाही”, असा हल्लाबोल संदिपान भुमरे यांनी केला.

संजय राऊतांना खुलं आव्हान

“संजय राऊतांना आमच्यावर आरोप करण्यापलिकडे काय काम आहे? संजय राऊत हे सकाळी आरोप करतात. यापलिकडे राऊतांकडे काहीही नाही. शिवसेना ठाकरे गटाने किती जागा लढवल्या आणि किती निवडून आल्या. तसेच शिवसेना शिंदे गटाने किती जागा लढवल्या आणि किती निवडून आल्या, हे सर्वांनी पाहिलं. आम्हाला उमेदवारी उशीरा मिळाली अन्यथा अजून आमच्या जागा वाढल्या असत्या. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा कशा येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करू, संजय राऊत जे आरोप करतात ते सर्व बिनबुडाचे आरोप असतात. राऊतांनी एखादी निवडणूक लढून दाखवावी”, असं आव्हान संदिपान भुमरे यांनी दिलं.