विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय नेते मंडळी देखील विविध मतदारसंघाचा दौरा करत आपल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. तसेच विविध ठिकाणी सभा, मेळावे आणि आढावा बैठका असं सध्या सर्व नेत्यांचं काम सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. पण या निवडणुकीच्या आधीच शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभेच्या निवडणुकीतील तिकीटावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्याला उद्धव ठाकरेंचा आदेश आला तर गद्दारांना निवडणुकीत पाडणार असा इशारा दिला, तर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना खुलं आव्हान देत आधी उमेदवारी आणून दाखवा मग कोण कोणाला गाडतं आणि कोण कोणाला निवडून आणतं ते पाहू, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं.

हेही वाचा : Sharad Pawar : “…अन् माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही”; शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

“मी इच्छुक असो किंवा नसो, पण प्रत्येक्षात उद्धव ठाकरे यांचा आदेश आला, ‘मातोश्री’चा आदेश आला तर तो आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असेल. त्यामुळे जर ‘मातोश्री’चा आदेश आला की या गद्दारांना निवडणुकीत पाडायचं, तर ज्यांनी गद्दारी केली तर त्यांना पाडलं पाहिजे”, असं ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.

संदीपान भुमरे काय म्हणाले?

ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत खैरे यांना खुलं आव्हान दिलं. खासदार भुमरे म्हणाले, “त्यांना म्हणावं की आधी मतदारसंघात उमेदवारी आणा. त्यानंतर आपण पाहू की कोण कोणाला गाडतं? कोण कोणाला निवडून आणतं, हे नंतर पाहू. जर चंद्रकांत खैरे विधानसभेला उभे राहिले तर त्यांचं डिपॉझिट मतदारच घालतील”, असा इशारा खासदार संदीपान भुमरे यांनी दिला.

संजय शिरसाट काय म्हणाले?

दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या विधानावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनीही भाष्य करत त्यांना प्रत्युत्तर देत खोचक सल्ला दिला. शिरसाट म्हणाले, “सर्वात आधी त्यांनी (चंद्रकांत खैरे यांनी) त्यांच्या पक्षातील त्यांचे जीवाभावाचे सहकारी आहेत ज्यांनी त्यांचा दोनवेळा पराभव केला, त्यांचा आधी बंदोबस्त करावा. मला वाटत नाही की त्यांना (चंद्रकांत खैरे) यांना उमेदवारी मिळेल. कारण पक्ष आता उमेदवार बदलायच्या स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचं ‘मातोश्री’वर किती वजन आहे? हे जर त्यांनी उमेदवारी मिळवली तरच ते सिद्ध होईल. अन्यथा चंद्रकांत खैरे यांचं पक्षातील वजन संपलं असं म्हणायला काही हरकत नाही”, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group mp sandipan bhumre on thackeray group chandrakant khaire assembly election 2024 gkt