लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन आठवडे झाले आहेत. मात्र, अद्यापही ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामधील निकालाचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. मात्र, यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर आता रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला. “पराभव जिव्हारी लागल्यामुळे हा रडीचा डाव सुरू आहे”, अला हल्लाबोल वायकरांनी ठाकरे गटावर केला.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंचं एनडीए सरकारबाबत मोठं विधान; म्हणाले, “काही महिन्यात दिल्लीत…”

रवींद्र वायकर काय म्हणाले?

“एक हजार पोलीस, २० उमेदवारांचे प्रतिनिधी आणि २० च्या २० उमेदवार मतमोजणी केंद्रामध्ये होते. मग रवींद्र वायकर आतमध्ये जाऊन काहीतरी वेगळं कसं करू शकतो? हे कसं शक्य आहे हे मला कळत नाही. हे काय चाललंय? फक्त रडीचा डाव चालला आहे. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांचं ट्विट आणि हे सर्व सुरु आहे. या रडीच्या डावाला मी महत्व देत नाही. त्यांना जे काय करायचं ते करूद्या. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने ही निवडणूक घेतली. ती योग्य पद्धतीने घेतलेली आहे. कोणी कोणाचा नातेवाईक आहे, म्हणून त्याने ते ईव्हीएम हॅक केलं, असं ईव्हीएम मशीन हॅक करता येत का? हे जे काय चाललं आहे, हा रडीचा डाव आहे. त्यामुळे मला यावर उत्तर द्यावसं वाटत नाही, तरीही मी यावर स्पष्टीकरण दिलं आहे”, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभा निवडणुकीतील काहीतरी गोंधळ झाला आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ते द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना जर पदाची शपथ दिली तर लोकशाहीचा खून झाला आहे, असं समजून काम करावं लागेल, अशा लोकांना शपथ कशी देऊ शकता?”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group ravindra waikar criticizes to uddhav thackeray group and mumbai north west lok sabha result gkt