Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. त्यानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. गुरुवारी (५ डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे आता महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. यातच भाजपा आणि शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.
यामध्ये एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, गृहमंत्री पद शिंदेंना देण्यास भाजपाचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता महायुतीच्या सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आणि कोणत्या पक्षाला किती खाते मिळणार? तसेच कोणते खाते कोणाला मिळणार? हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती सांगितली जाते. मात्र, असं असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं भाष्य केलं आहे. मंत्रिपदे देताना कसरत करावी लागणार असल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
संजय शिरसाट काय म्हणाले?
“महायुतीत २३२ आमदार आहेत, तर एकूण मंत्रिपदे ४३ आहेत. त्यामुळे ४३ आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्यामुळे निश्चितच यामध्ये थोडी कसरत करावी लागेल. त्यामध्ये अनेक सीनियर आमदार आहेत, अनेकांचा अनुभव आहे. या सर्वांचा ताळमेळ बसवण्यासाठी नेत्यांना कौशल्य दाखवावं लागणार आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
गृहखातं कोणाकडे असेल?
महायुतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचं वाटप करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती खाते मिळतात? हे लवकरच स्पष्ट होईल. विधानसभेच्या निकालानंतर आणि सरकार स्थापनेच्या आधी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहखात्यावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे हे गृहखातं मिळण्यासाठी आग्रही आहेत, तर भाजपा गृहखातं सोडण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता यासंदर्भातील निर्णय अद्याप झाला नसल्याचं सांगत गृहखातं कोणाकडे असेल? यावर आमचे वरिष्ठ निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली.
मंत्रिमंडळाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचंही सूचक भाष्य
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं. हिवाळी अधिवेशन होण्याच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.