Gulabrao Patil : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना एक विधान केलं. ‘आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा’, असा अजब सल्लाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना दिला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत आहे. यानंतर गुलाबराव पाटील यांनी आपल्या विधानावर पुन्हा स्पष्टीकरण देत विनोदाचा भाग होता असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
“माझं म्हणणं आहे की आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत. त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण १०० टक्के करत आहोत. आपण यावेळी एक स्पर्धा ठेवणार आहोत, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जी जिल्हा परिषदेची शाळा जास्तीत जास्त विद्यार्थी फोडून आणेल, त्या शाळेला आमदार फंडामधून १० लाख रुपये द्यायचे. त्या गुरजींनी आजपासून तयारी करायची. आता हा विनोदाचा भाग असला तरी मी नम्रपणे सांगतो की काही शाळा अशा आहेत की ३० ते ३२ विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेवर दोन, दोन शिक्षक आहेत. काही शाळेत दोन विद्यार्थी आहेत. मग तुम्ही सांगा शासनाची काय चूक आहे?”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
“आता आपल्याला देखील बदलण्याची गरज आहे. माझ्या देखील दोन शाळा आहेत. माझ्या शाळेतील शिक्षक परवापासून विद्यार्थी जमा करण्यासाठी कामाला लागले आहेत. मी आताच दोन अधिकाऱ्यांशी बोलत होतो. आता १५ जून रोजी शाळा सुरु होणार आहेत. मागच्या वेळी जळगाव ग्रामीणमधील विद्यार्थ्यांची जी सख्या होती ती ४२ हजार होती. मग त्यामध्ये किती वाढ झाली विचारलं तर काहीच वाढ झाली नाही. मग आम्ही जसं पक्षाचे लोक फोडतो, तसं तुम्ही (इंग्रजी शाळेचे) विद्यार्थी फोडले पाहिजेत”, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं.
“आपण गुणवत्तेत पहिले आलो असलो तरी त्यावरच थांबून चालणार नाही. मी माझ्या आयुष्यात खूप लोकांना त्रास दिला, पण तो तेवढ्यापुरता असतो, बोलतो आणि लगेच विसरतो. मात्र, शिक्षकांना कधीही त्रास दिला नाही. कारण शिक्षकांबाबत आमच्या मनात एक वेगळं स्थान आहे. आपण फक्त पटसंख्या टिकवू शकलो असतो तर आज ५० हजार डीएड झालेले मुलं नोकरीला लागले असते”, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
विधानानंतर सारवासारव
गुलाबराव पाटील यांनी आपल्या विधानानंतर पुन्हा सारवासारव केली. ते म्हणाले की, “मी विनोदाने बोललो, जसं आम्ही काही कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं शिक्षकांनी हे करावं, त्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता. शाळेची पटसंख्या कशी वाढेल? हे सांगण्याचा तो एक विनोदाचा भाग होता. यामध्ये दुसरा चुकीचा भाव नव्हता”, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आपल्या विधानानंतर सारवासारव केली.