शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीचं समर्थन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाचा मुद्दा भाजपा आणि शिंदे गटाकडून केवळ राजकीय स्वार्थासाठी वापरला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सत्तेत बसणाऱ्यांना हिंदुत्वाबद्दल बोलू नये अशा आशयाची टीका करत शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवरुन टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबरच भाजपालाही लक्ष्य केलं आहे. दिल्लीत बादशाही, दुसरे महायुद्धासारखे अनेक ऐतिहासिक संदर्भ देत शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबतची युती योग्य कशी आहे यासंदर्भातील युक्तीवाद केला आहे. तसेच भाजपासोबतच्या २५ वर्षांच्या युतीदरम्यान त्यांनी हिंदुत्वाचे कोणते दिवे लावले असा प्रश्नही शिवसेनेनं विचारला आहे.

नक्की वाचा >> Shivsena-Sambhaji Brigade Yuti: “…त्यामुळे ही युती नैसर्गिक”; शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया

ही राज्यातील मोठ्या परिवर्तनाची चाहुल
“शिवसेनेप्रमाणेच संभाजी ब्रिगेडही महाराष्ट्रातील सळसळत्या रक्ताची संघटना आहे. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या सामाजिक, राजकीय, लोककल्याणकारी आणि महाराष्ट्र धर्माशी इमान राखणाऱ्या संभाजी ब्रिगेडने कठीण काळात शिवसेनेस प्रेमाचे आलिंगन द्यावे यापेक्षा मोठा राजधर्म कोणता असेल? महाराष्ट्र हित रक्षणासाठी, राज्याच्या स्वाभिमान रक्षणासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणे ही राज्यातील मोठ्या परिवर्तनाची चाहुल आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल
“आज शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी खुपसले आहेत. छत्रपती संभाजीराजांचे औरंगजेबाने हालहाल केले. कारण राजे धर्मरक्षक होते. दिल्लीच्या बादशहाने छत्रपती शिवरायांना दिल्लीत बोलावून अपमानित केले व नंतर बंदी बनवले. कारण छत्रपती शिवराय हे हिंदवी स्वराज्य संस्थापनाचे कार्य हाती घेऊन दिग्विजयाच्या दिशेने झेपावले होते. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी शिवराय-संभाजीराजेप्रेमी संघटनादेखील दिल्लीतील बादशाहीच्या डोळ्यात खुपू लागली आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर खुपसून महाराष्ट्राच्या भूमीत बेइमानी व दुहीचे बीज त्यांनी फेकले. या कठीण समयी संभाजी ब्रिगेडसारखी जहाल, सळसळत्या रक्ताची संघटना भावाच्या मायेने पाठीशी उभी राहिली याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल,” असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

ही फक्त सुरुवात आहे
“सर्वत्र गद्दारीचा मुसळधार सुकाळ सुरू आहे. इमानाचे शेपूट आत घालून जो तो आपल्या बेइमानीचे सर्टिफिकेट दाखवण्यासाठी पुढाकार घेत असताना गेल्या पंचविसेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या गावखेड्यात काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने शिवसेनेचा हात पकडला आहे हे शुभ लक्षण आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांनी स्पष्टच सांगितले, आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत आहोत, ते सत्यच आहे. संभाजी ब्रिगेडशी संवाद आणि युती ही फक्त सुरुवात आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान्यांना धडा घेता येईल
“महाराष्ट्राच्या हितासाठी आणखी काही महत्त्वाचे घटक लवकरच एकत्र येतील व स्वाभिमान-अभिमानासाठी रणशिंग फुंकले जाईल. सर्व राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन महाराष्ट्र हिताच्या शिखराकडे पाहायला हवे. दुसऱ्या महायुद्धात जी राष्ट्रे एकमेकांविरुद्ध उभी ठाकली होती, एकमेकांच्या मोठ्या प्रमाणावरील विनाशास कारणीभूत झाली होती, तीच राष्ट्रे आज इतिहास आणि वैर विसरून एकमेकाला नव्याने सहकार्य करण्यास पुढे आली आहेत. या एकाच उदाहरणावरून महाराष्ट्र स्वाभिमान्यांना धडा घेता येईल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘खोके हराम’ मांडलिक ऊठसूट शिवरायांचे नाव घेत असतात, पण…
“दुसऱ्या महायुद्धामध्ये जी राष्ट्रे बेचिराख झाली होती त्यांनीही परस्परांतील भेदाभेद विसरून आपापल्या राष्ट्रांची पुनर्बांधणी केली आणि जुन्या दुश्मनांशी मनोमिलन केले. इतिहासातील किंवा भूतकाळातील काही घटनांना जाणीवपूर्वक कोळशाप्रमाणे उगाळत बसण्यात अर्थ नाही हे आता ध्यानी घेतले पाहिजे. आज महाराष्ट्र स्वाभिमान्यांची बरीचशी शक्ती धर्म आणि जात यांच्या नावाने शिमगा करीत, एकमेकाला डिवचण्यात, हल्ले करण्यात खर्ची पडत आहे. त्यातून एकमेकांचेच बळ कमी होत आहे आणि याचाच फायदा भाजपसारखे लोक देशभर घेतात, हे लक्षात घ्यायला हवे. दुसरे असे की, हे आजचे भाजपावाले व त्यांचे सध्याचे ४०-५० ‘खोके हराम’ मांडलिक ऊठसूट शिवरायांचे नाव घेत असतात, पण राष्ट्रभक्तीसाठी निःस्वार्थ भावनेने केलेली इतिहासाची उजळणी वेगळी, शिवराय-संभाजीराजांचे नामस्मरण वेगळे आणि या ना त्या मतलबी कारणाने शिवरायांचे नाव घेणे वेगळे. आज मतलबापोटी शिवरायांचे जपज्याप सुरू आहेत. या सर्व ढोंगावर प्रहार करण्यासाठी संभाजी ब्रिगेड नामक मर्द मावळ्यांची फौज शिवसेनेच्या सोबतीस आली आहे. ही एका नव्या वाटचालीची सुरुवात आहे,” असा दावा शिवसेनेनं केला आहे.

बाळासाहेबांचा एक सत्य विचार…
“संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर हे महाराष्ट्र धर्म मानतात. ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारांचे पाईक आहेत. प्रबोधनकार हिंदुत्वाचे झुंजार शिपाईगडी होतेच. त्यामुळे जास्तीत जास्त एकमतावर दोन लढाऊ संघटनांची ‘युती’ झाली आहे, असे समजा! नाहीतरी ज्या भाजपाबरोबर आम्ही पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या नावाने नांदलो, त्यांनी तरी हिंदुत्वाचा असा कोणता दिवा पेटवला? राजकीय स्वार्थाचाच सगळा बाजार आणि लिलाव होता. तिकडे कश्मीरात भाजपाने तर फुटीरतावादी मेहबुबा बाईच्या पक्षाशी असंग केला आणि वर हीच मंडळी जगाला हिंदुत्वाचे पाठ पढवत आहेत. नाही म्हटले तरी राम मंदिर वगैरे विषयांना विरोध करणाऱ्या नितीश कुमारांशी त्यांनी बिहारात ‘पाट’ लावलाच होता व नंतर त्यांच्या पाठीत खंजीरही खुपसला. सध्याच्या भाजपा मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाचा खोटा उमाळा आलाच आहे म्हणून बाळासाहेबांचा एक सत्य विचार सांगतो. ‘घातकी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा!’ असे बाळासाहेब म्हणत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला
“आता ‘आपण नक्की कोण?’ हे भाजपाने ठरवायचे. यांना ना हिंदुत्व प्यारे ना शिवराय. यांना फक्त सत्ता प्यारी आहे. त्या सत्तेसाठी त्यांनी महाराष्ट्राच्या इज्जतीशी खेळ सुरू केला. अर्थात अशा गद्दारांना महाराष्ट्र अनेकदा पुरून उरला आहे. शिवसेनेच्या सोबतीला आता संभाजी ब्रिगेड आहे. छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे. ते खरे धर्मवीर होते. त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले. त्या काळात औरंगजेबाकडे ‘ईडी’चा खंजीर नव्हता. नाहीतर त्याने त्याचाही वापर केला असता. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला. महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला. आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हीही जिंकू. नक्कीच जिंकू! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Story img Loader