लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे इंडिया आघाडीत जागावाटपाला वेग आलेला आहे. या निवडणुकीत भाजपातर्फे नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत. इंडिया आघाडीने मात्र अद्याप आपले नेतृत्व कोणाकडे असेल हे ठरवलेले नाही. यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या मराठी मृत्तवाहनीने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
नेतृत्व कोणाकडे असेल?
यावेळी बोलताना संजय राऊत यांना इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आमचं सरकार आल्यास नेतृत्व कोणीही करू शकेल. भाजपामध्ये मोदी हेच सर्वस्व आहे. तसं आमच्याकडे नाही. देश हा एकाचा नसतो. लोकशाहीमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती या पदासांठी वेगवेगळे चेहरे पाहिजेत. इंडिया आघाडीत वेगवेगळे चेहरे आहेत. स्वत: राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आहेत. उद्धव ठाकरे हेदेखील आहेत. येथे कोण किती जागा जिंकेल याचा विषय नसून नेतृत्वाचा विषय आहे. तसेच देश कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल हा मुख्य मुद्दा आहे. निवडणूक झाल्यावर आमचे नेतृत्व ठरेल, असे राऊत म्हणाले. तसेच भाजपाकडे मोदी यांच्याशिवाय दुसरा चेहरातरी आहे का? असा सवालही संजय राऊतांनी केला.
“भाजपा हा चोरांचा पक्ष”
भाजपाकडून नरेंद्र मोदी हेच आमची गॅरंटी आहेत, असा प्रचार केला जातोय. याबाबत विचारले असता. “भारतीय जनता पक्ष हा चोरांचा पक्ष आहे. तो चोरबाजार आहे. गॅरंटी शब्द कोणी काढला. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस सरकारने हा फॉर्म्युला दिला होता. काँग्रेसची ही प्रचारयंत्रणा होती. हा शब्द भाजपाने घेतला. गॅरंटी शब्दावर लोक विश्वास ठेवतात असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मोदी गॅरंटी हा शब्द काढला,” अशी टीका राऊत यांनी केली.
आम्ही काय अंगठेबहाद्दर आहोत का
“त्यांनी आघाड्या चोरल्या. खोटेपणावर फार काळ राजकारण चालत नाही. लोक फार काळ फसणार नाहीत. त्यांनी एका-एका जागेचा हिशोब करू द्या काही हरकत नाही. आम्ही काय अंगठेबहाद्दर आहोत का,” असेही राऊत म्हणाले.