Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला परभवाचा धक्का बसला. पराभवानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभावामागची कारणं काय? हे शोधण्याचं काम सुरु आहे. यातच विरोधकांकडून ईव्हीएमबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आज शिवसेना ठाकरे गटात मनसेच्या घाटकोपरमधील काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भारतीय जनात पार्टी, शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार टीका केली. ‘पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक हेतू लागतो, दिशा लागते, पण हे त्या पक्षात (मनसेत) काहीही नाही’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यांदेखत ओरबाडून नेली जात आहे. मग अशावेळी आपण षंढ म्हणून फक्त बघत बसणार का? ठीक आहे तुम्ही कोणत्या पक्षातून आलात त्या पक्षाबाबत (मनसे) मला बोलायचं नाही. मात्र, पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. पण हे काहीच नाही. मग अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे (मनसेत) मरमर मेहनत करतात. पण त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात. होय शिवसेनाच कारण मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव इतर कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही हे मी अनेकदा उघडपणे सांगितलं आहे आजही तेच सांगतो आहे. फक्त आपली निशाणी बदलली आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मीच होतो’
“आपली निशाणी बदलली तरीही मी महाराष्ट्रात जेव्हा फिरत होतो तेव्हा सगळे मला म्हणत होते उद्धवजी तुम्हीच येणार. मला गंमत वाटते की जे काही सर्व्हे चालले होते, त्यात जनतेच्या मनतला मुख्यमंत्री कोण होता? मीच होतो. मग त्याची दांडी कशी उडाली? कारण हे सगळं चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आहे. हे राज्य आता आपल्याला उलथवून टाकावं लागेल. एक ठिणगी तर पडली आहे. मागच्या रविवारी मी बाबा आढाव यांच्या उपोषण स्थळी गेलो होतो. आता तुम्हाला झोपून चालणार नाही. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. योग्यवेळी तुम्ही मशाल हाती घेतली आहे, शिवसेनेचा भगावा हाती घेतला आहे. आता तुमचे जे काही प्रश्न आहेत, जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तुमच्या बरोबर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेन एवढी ग्वाही देतो”, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.