Aditya Thackeray On Raj Thackeray : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या आधी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे, सभा, मतदारसंघांचे दौरे अशा प्रकारचं काम राजकीय नेत्यांकडून सुरु असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. “पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात”, अशी खोचक आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे काय म्हणले?

“पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठलेला आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात. मग महाराष्ट्र पिंजून काढणार, असे त्यांचे दौरे चालतात. सुपारीबाज पक्ष आहे ते त्यांचं काम करतील. आम्ही आमचं जनतेच्या सेवेचं काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांच्या काळात मग त्यामध्ये कोवीडच्या काळात किंवा मुंबईत इतर काही घटना घडत असताना हा पक्ष दिसला तरी का? त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सुपारीबाज पक्ष आहे तो तिथेच राहिल”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी मनेसवर केला.

हेही वाचा : Manoj Jarange On Raj Thackeray : “ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, त्यांच्यावर…”, मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना सुनावलं

संदिप देशपांडेंना टोला

विधानसभेच्या निवडणुकीत वरळी मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदिप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला लगावला. “मला वाटलं बायडन येत आहेत”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसेने कोणत्या दोन उमेदवारांची घोषणा केली?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, तरी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा अॅक्शन मोडमध्ये आहेत. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते आज सोलापूरमध्ये होते. आज सोलापूरमध्ये असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर

राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता सध्या राज ठाकरेंकडून या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यापैकी दोन ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group aditya thackeray criticized to mns president raj thackeray and maharashtra politics gkt
Show comments