Aaditya Thackeray On Narayan Rane : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह आदी नेत्यांचा सहभाग होता. मात्र, याचवेळी भाजपा नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावरील आल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
त्यामुळे काहीवेळ राजकोट किल्ल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थिनंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली. “खरं तर आज आपला मोर्चा होता. मात्र, या मोर्चामध्ये काही चिंधी चोर समोरून आले”, अशा खोचक शब्दांत आदित्य ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“खरं तर आज आपला मोर्चा होता. मात्र, या मोर्चामध्ये काही चिंधी चोर समोरून आले. आता श्रावण सुरु आहे अन्यथा त्यांच्या खिशातून कोंबड्याही काढल्या असत्या. जाऊद्या मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज त्यांचा बालिशपणा होता. आता या ठिकाणचे स्थानिक खासदार कसे निवडून आले हे देखील सर्वांना माहिती आहे. ही घटना घडल्यानंतर येथील खासदार चार दिवसांनी आले. मग चार दिवस खासदार कुठे होते? ते आजच कसे आले?”, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली.
“राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आम्ही विचार केला की, या ठिकाणी आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे. कारण आपण महाराष्ट्रातील माणसं आहोत. भारतीय जनता पक्षाने गेल्या १० वर्षात जे-जे काम केलं. त्या सर्व कामांना गळती लागली. भाजपाने केलेलं असं कोणतंही काम नाही की त्या ठिकाणी गळती लागली नाही. अयोध्येतील राम मंदिर असो किंवा नवीन संसद भवन असो. नवीन संसद भवनालाही गळती लागली एवढंच नाही तर दिल्ली विमानतळाचं छत देखील कोसळलं”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला.
राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं?
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही सहभाग होता. मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर आले. मात्र, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील, विनायक राऊत हे किल्ल्यावर गेलेले असल्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांना राजकोट किल्ल्यावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. त्यामुळे नारायण राणे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे यांचे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक होत ते बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना निघायला सांगा, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनीही किल्ल्यावर काहीवेळ ठिय्या आंदोलन केलं. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरादार घोषणाबाजी केल्यामुळे काहीवेळ राजकोट किल्ल्यावर ताणाव निर्माण झाला होता. मात्र, यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करत समजूत घातली. यानंतर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील हे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले.