Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि ‘बीसीसीआय’वर हल्लाबोल केला आहे. तसेच बांगलादेश आणि टीम इंडिया कसोटी मालिकेवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला घेरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे, त्यासाठी ‘बीसीसीआय’ने त्यांना पायघड्या घातल्या आहेत. हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे कोणाचा दबाव आहे? कुठं गेलं तुमचं हिंदुत्व?”, असे सवाल करत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारसह ‘बीसीसीआय’वर घणाघाती टीका केली आहे.

हेही वाचा : Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?

“बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. त्यासाठी ‘बीसीसीआय’ने त्यांना पायघड्या घातल्या आहेत. आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मीडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का?, जर खऱ्या असतील तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव आहे? आणि जर या बातम्या खोट्या असतील तर, सोशल मीडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार!) हा भाजपाने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला ‘जुमला’ तर नाही ना? हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्या क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठे गेलं ह्यांचं हिंदुत्व? की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं?”, असे सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि ‘बीसीसीआय’वर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये पहिला सामना चेन्नईत तर दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळला जाणार आहे. मात्र, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावरून आणि बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group leader aaditya thackeray on india vs bangladesh test series and bjp politics gkt