Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 : महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. तसेच लवकरच सरकार स्थापन होईल, असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीला अपयश आल्यामुळे आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून मंथन बैठका घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी आमदारांची आणि पराभूत झालेल्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काही वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बैठकीत काय चर्चा झाली? यासंदर्भातील माहिती सांगत काही सूचक भाष्य केलं. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका आपण स्वतंत्र लढलं पाहिजे, असं मत मांडलं असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. निवडणुका आघाडीत न लढता स्वबळावर लढल्या पाहिजे, अशा प्रकारचा सूर काही पदाधिकाऱ्यांचा होता, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते. त्यामुळे विधानसभेत आलेल्या अपयशानंतर यापुढे ठाकरे गट आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

हेही वाचा : सरकार स्थापनेसंदर्भात नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य – एकनाथ शिंदे

अंबादास दानवे काय म्हणाले?

“बैठकीत काही चर्चा झालेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन केलं. भलेही आमचे आमदार कमी निवडून आलेले असतील. शिवसेना एका आमदारावर देखील लढलेली आहे. वामनराव महाडीक किंवा छगन भुजबळ असतील, हे एकटे लढले होते. शिवसैनिक कसा असतो याचं महाराष्ट्राला दर्शन झालेलं आहे. आता तर आम्ही २० आहोत. आमची संख्या कमी झाली असली तरी आम्ही २० आहोत. या २० आमदारांनी देखील महाराष्ट्राच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी लढावं आणि काम करावं अशा प्रकारचा निर्धार पक्षप्रमुखांच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे”, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

“विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काही भूमिका येत असतात. बैठकीत ईव्हीएमबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएमविषयी आम्ही न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार आहोत. संघटनेविषयी काहींनी मत मांडलं की आपण यापुढे स्वतंत्र लढलं पाहिजे. कोणी म्हणतं की एकत्र लढलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या भूमिका सर्वांनी मांडलेल्या आहेत. सर्वांची मतं उद्धव ठाकरे यांनी देखील ऐकून घेतले आहेत”, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.