Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून आहे. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. राजन साळवी यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपण योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. यानंतर आज राजन साळवी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या भेटीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं भाष्य केलं आहे. “विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि नाराज आहे. मी माझ्या भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आहेत”, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजन साळवी काय म्हणाले?

“विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ज्या भावना होत्या, त्या मलाही समजल्या आणि काही लोकांनीही मला त्यांच्या भावना सांगितल्या. मात्र, माझ्या पराभवाला कारणीभूत ज्या घटना आहेत. त्याबद्दल मी नक्कीच नाराज होतो आणि नाराज आहे. माझ्या नाराजीच्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील माझ्या भावना ऐकून घेतल्या आहेत”, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : पुण्यात मराठी कर्मचाऱ्यांचा पगार थकवला, कार्यालयात हिंदी बोलण्याची सक्ती; मनसेचा खळखट्याक अन्…!

‘योग्यवेळी योग्य निर्णय घेणार’, साळवींनी केलं होतं सूचक विधान

“गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. या पार्श्वभूमीवर मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावं आणि संवाद साधावा. मी राजापूर या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तसेच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या,अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मी देखील सांगितलं की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन”, असं राजन साळवी यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

‘पराभवाला वरिष्ठ कारणीभूत’

“माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. आज पक्षावर आणि माझ्यावरही दु:खाचा डोंगर आला. यासाठी कोण कारणीभूत आहे हे शोधणं गरजेचं आहे. जर शोधलं नाही तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते. मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे”, असं राजन साळवी यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group leader rajan salvi uddhav thackeray meet in mumbai and rajapur assembly election 2024 politics gkt