Eknath Shinde : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा पराभव झाला. खरं तर या निवडणुकीत महायुतीने तब्बल २०० पेक्षा जास्त जागा मिळवल्या. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार पुढच्या काही दिवसांत स्थापन होईल. सध्या सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यासाठी दिल्लीत उद्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा तिन्ही नेत्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला ठरणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या बैठकीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचं बोललं जात आहे. मात्र, यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नाही तर त्यांना दावा सोडायला लावला”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. त्या टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.
हेही वाचा : महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला कसा असेल? अजित पवारांकडून महत्त्वाची माहिती; म्हणाले, “दिल्लीत…”
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे असं वाटत नाही, तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडायला सांगितलं आहे. जर मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडायचा असता आणि मनाचा तेवढा मोठेपणा असता तर ज्यावेळी २३ तारखेला निकाल समोर आला तेव्हा भाजपाची संख्या पाहता एकनाथ शिंदेंनी आज जी भूमिका मांडली ती तेव्हाच मांडायला हवी होती. जसं की अजित पवारांनी सांगितलं होतं की संख्याबळ भाजपाकडे आहे, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होईल. आम्ही भाजपाचे विरोधक आहोत तरीही आम्ही देखील हे मान्य केलं पाहिजे की जर भाजपाकडे संख्याबळ जास्त आहे तर त्यांचा मुख्यमंत्री व्हायला हवा”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
शिंदेंनी दबावाचं राजकारण केलं
“आता एकनाथ शिंदे यांनी दबावाचं राजकारण केलं. गेल्या दोन दिवसांपासून दबावाचं राजकारण झालं. कुठे दुग्धाभिषेक झाला, कुठे महाआरत्या केल्या. कुठे ट्वीट करून लोकांना सांगितलं की माझ्यासाठी एकत्र येऊ नका, म्हणजे अप्रत्यक्ष एकत्र या असा त्याचा अर्थ होतो. शिंदे गटाचे अनेक नेते असं म्हणत होते की मराठा मुख्यमंत्री हवा. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या आहेत तर त्यांनाच मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. तसेच त्यांच्या एका नेत्याने ट्वीट केलं होतं की एकनाथ है तो सेफ है, त्यामुळे मला असं वाटतं की हे दबावाचं राजकारण करत होते. पण त्यांच्या या दबावाच्या राजकारणाचा काहीही फायदा झाला नाही”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.