लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रामध्ये एनडीएच सरकार स्थापन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. एनडीएमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू सहभागी आहेत. मात्र, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून एनडीए आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेकदा भाष्य केलं आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनीही केंद्रातील एनडीए सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. “काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो”, असं सूचक विधान आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी बोलताना केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“आपण पाहिलं की एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमबद्दल ट्वीट केलं. तसेच आम्ही सर्वजण ईव्हीएमबाबत बोलत आहोत. आता मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात घोळ झाल्याची चर्चा आहे. यानंतर निवडणूक आयोगाने तेथील सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे गटातील काहीजण त्या ठिकाणी फोन घेऊन उभे होते. त्यांच्या फोनमध्ये एक अॅपही होतं. या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर तुम्ही अशा लोकांना पदाची शपथ कशी देऊ शकता?”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा : “ईव्हीएम हा एक ‘ब्लॅक बॉक्स’…”; एलॉन मस्क यांनी EVM वर शंका उपस्थित करताच राहुल गांधींची प्रतिक्रिया!

“लोकांचा भारतीय जनता पार्टीवर प्रचंड राग होता. त्यामुळे भाजपाला लोकांनी २४० वर आणलं आहे. जर ईव्हीएम नसतं तर आज २४० पर्यंतही पोहोचले नसते. जगभरात ईव्हीएम वापरलं जात नाही. एलॉन मस्क यांचा तंत्रज्ञानाबद्दल एवढा विश्वास असूनही त्यांना ईव्हीएमबद्दल विश्वास नाही. तुम्ही जर फोनवरून ओटीपीने ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकतं. या निवडणुकीत आम्ही एवढंच म्हणतो की सीसीटीव्ही फुटेज द्या. पण ती हिंमत हे करत नाहीत”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.

“भारतीय जनता पार्टीमध्ये काहीही ताळमेळ नाही. एकजण ४०० पारच्या घोषणेबद्दल बोलतो, तर दुसरं आणखी काही बोलतो. आता निवडणूक होऊन गेली आहे. लोकांनी त्यांना जागा दाखवली. इंडिया आघाडी आज २३७ वर तर एनडीए २४० वर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची पूर्णपणे खात्री मला आहे. भाजपाचं राजकारण हे लोकांवर धाडी टाकण्याचं आणि धमक्या देण्याचं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये एकवाक्यता नाही. भाजपाची संसदीय समितीची बैठक अद्यापही झालेली नाही”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group mla aaditya thackeray big statement on nda government and pm modi gkt