Aaditya Thackeray : मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले आहेत. यापैकी शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडला. या दसरा मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. “अदानींची‌ कामं जोपर्यंत‌ होत‌ ‌नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी दसरा मेळ्यात बोलताना केला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मला आठवतं की याच दिवशी, म्हणजे दसरा मेळाव्यामधून युवासेनेची स्थापना केली होती. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या हातात तलवार दिली आणि सांगितलं की, या महाराष्ट्रासाठी लढ. गेल्या १० ते १५ वर्ष या मैदानात मी येत आहे. उद्धव ठाकरे यांचेही या ठिकाणी भाषण ऐकले. २०२४ हे साल आपल्यासाठी महत्वाचं आहे. माझ्या आजोबांचा आशीर्वाद आहे. मला कदाचित त्यांनी सांगितलं असेल की, आदित्य २०२४ हे साल फार महत्वाचं आहे. ही लढाई फार महत्वाची आहे. आपल्याला बदल घडवायचा आहे. २०२४ च्या विधानसभेची निवडणूक कधी लागणार? याची आपण अनेक महिने वाट पाहत होतो. पण आता तो क्षण जवळ आलेला आहे”, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली.

हेही वाचा : Dasara Melava 2024 Live Updates : “काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटते”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

ते पुढे म्हणाले, “एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की, अदानीचे सर्व कामे होत नाहीत. सर्व कामांचे जीआर निघत नाहीत. तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही. त्यामुळे ही लढाई महत्वाची आहे. आपल्या या खऱ्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. त्यामुळे हे देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे. राज्यात लूट आणि भ्रष्ट्राचार सुरु आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की मुंबईला अदानीच्या घशात घालू द्यायचं का? आता तुमच्या हातामध्ये हा निर्णय आहे. राज्यातील या सरकारच्या काळात फक्त दोनच गोष्टी झाल्या. एक म्हणजे मुंबईची लूट आणि दुसरं म्हणजे, महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला आणि त्यांच्या आवडत्या मित्रांच्या कंत्राटदारांच्या घशात घालायचं काम. हे काम या सरकारने केलं. एकनाथ शिंदे हे ५० खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यांना रोखायचं असेल तर आपल्याला निवडणुकीत ताकद दाखवायला लागेल”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.