Sanjay Raut on Eknath Shinde : आगामी विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांनी कंबर कसली असून महाराष्ट्रात अनेक नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आजपर्यंत आम्ही पाहिले नाहीत. मात्र, ज्या दिवशी त्यांची सत्ता जाईल, त्या दिवशी दिल्ली त्यांना पायाशीही उभं करणार नाही”, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत काय म्हणाले?

“महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला चांगलं यश मिळालं. आता विधानसभेची तयारी सुरु आहे. काल बुलढाण्यात होतो. आज अकोल्यात आहे. या राज्यातील वातावरण असं आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ताबदल होईल. हे सरकार सध्या राज्याच्या तिजोरीमधून किती उधळपट्टी करत आहे? लाडक्या बहि‍णींना पैसे मिळाले पाहिजेत. त्यांचा १५०० रुपयांचा आकडा आहे. मात्र, पुढे जर आमचं सरकार आलं तर त्यामध्ये भरघोष वाढ होईल”, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

हेही वाचा : Sanjay Raut : “अनिल देशमुख आणि मी जेलमध्ये खिमा पाव बनवायचो”, राऊतांनी सांगितली तुरुंगातील दिनचर्या; कसाबच्या वस्तू पाहून म्हणाले…

“लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महायुतीला लाडक्या बहि‍णींची आठवण झाली. मात्र, तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार आणि फुटलेले लाडके खासदार या पलिकडे यांचं लाडकं कोणीही नव्हतं. एका-एका आमदाराला ५०-५० कोटी आणि एका-एका खासदाराला १०० कोटी देण्यात आले. ठाकरे गटाचे पदाधिकारी फोडण्यासाठी आताही कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण लाडक्या बहि‍णींसाठी १५०० रुपये देण्यात येत आहेत. यावरही चर्चा होईल. निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्ये राज्यात सत्तातर झालेलं दिसेल. त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीने काम करत आहे. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आहेत. पैसा आणि सत्ता यापुढे महाराष्ट्र झुकणार नाही”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

…तेव्हा तुम्ही सुटणार नाहीत

“आमच्या नितीन देशमुखांना सातत्याने त्रास दिला जात आहे. हा त्रास का दिला जात आहे? तर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला जात आहे. मग तुमचं काय चाललंय? आमचे आमदार असतील, किंवा आमचे पदाधिकारी असतील आमच्या चौकशा तुम्ही करता का? मात्र, जेव्हा तुमची चौकशी आम्ही करू, तेव्हा तुम्ही सुटणार नाहीत, एवढंच सांगतो”, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत

“महाराष्ट्रात सावत्र भाऊ कोणीही नाही. जे सावत्र भाऊ असतील ते दिल्लीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राला सावत्र वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचे सावत्र भाऊ नाही तर ते भाऊच नाहीत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. त्यांनी जेवढं नुकसान केलं तेवढं गेल्या १०० वर्षात कोणीही केलं नाही. आताचे मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आम्ही आजपर्यंत पाहिले नाहीत. याआधी दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले. मात्र, यांच्याएवढा दिल्लीपुढे झुकणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जे बोलत आहेत ते दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहेत. पण ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशीही उभं करणार नाही”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group mp sanjay raut on cm eknath shinde and devendra fadnavis narendra modi amit shah gkt